मुंबई-भारतीय नौदलाच्या इतिहासात 15 जानेवारी 2025 हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. निलगिरी, सूरत या विनाशिका अन् वाघशीर ही पाणबुडी अशा तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांचा ताफा भारतीय नौदलात सामील झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालाय. यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नौदल प्रमुखांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारताचे स्थान जागतिक पातळीवर उंचावले : एकाच दिवशी नौदलाच्या ताफ्यात दोन विनाशिका आणि एक पाणबुडी सामील होण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथे या तिन्ही लढाऊ युद्धनौकांचं आरेखन आणि बांधणी करण्यात आलीय. या युद्धनौका निर्मितीच्या माध्यमातून संरक्षण उत्पादनासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा भारताने पुन्हा एकदा प्रत्यय दिलाय. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या युद्धनौका आणि पाणबुड्या यशस्वीरीत्या बनवून कार्यान्वित करण्यात आल्याने युद्धनौका आरेखन आणि बांधणी क्षेत्रात भारताने केलेल्या जलद प्रगतीवर प्रकाश पडलाय. यामुळे संरक्षण उत्पादनात भारताचे स्थान जागतिक पातळीवर उंचावून अधिक मजबूत झालंय.
नौदलाच्या ताफ्यातील युद्धनौकांमुळे अधिक सज्जता- मोदी :आत्मनिर्भर भारतासाठी आणि भारतीय नौदलासाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौदलाची स्थापना केली आणि त्याला बळकट केलंय. 21 व्या शतकातील नौदलाला सशक्त करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. भारतीय बनावटीच्या युद्धनौका नौदलात सामील होत आहेत, याच्या निर्मितीत असलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. भारताचा समृद्ध इतिहास राहिला आहे, भारत आता एक प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयास येत आहे. आज ताफ्यात आलेल्या युद्धनौकांमध्ये या सामर्थ्याची झलक आहे. शिवाजी महाराजांच्या भूमीवरून नौदलाला अधिक सामर्थ्यवान केलं गेलंय. काही वर्षांपूर्वी कलवरी श्रेणीच्या पाणबुडीला नौदलात सामील करताना सहभागी होण्याची संधी मिळाली होती. या श्रेणीच्या सहाव्या पाणबुडीला ताफ्यात समाविष्ट करण्याची संधी मिळालीय. भारताची सुरक्षा आणि प्रगतीला नवीन सामर्थ्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. भारत आता एक मजबूत साथी म्हणून ओळखला जातोय. भारत विस्तारवाद नव्हे तर विकासवाद म्हणून काम करीत आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढलंय. देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येक सैनिकाचं त्यांनी कौतुक केलंय.
इंडो पॅसिफिकमध्ये भारताचे नेहमीच सहकार्याला प्राधान्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही पूर्ण जगाला कुटुंब समजून काम करतो. सबका साथ, सबका विकास या सिद्धांतावर आम्ही काम करतो. इंडो पॅसिफिकमध्ये भारताने नेहमीच सहकार्याला प्राधान्य दिलंय. समुद्री मार्ग सुरक्षित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दहशतवाद, शस्त्रात्रांचा व्यापार आणि अंमली पदार्थांच्या तस्करीपासून सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. समुद्राला संरक्षित ठेवण्यासाठी आम्ही जागतिक पातळीवर सहकार्याची भूमिका घेणार असल्याचे ते म्हणाले. भारताने या सर्व क्षेत्रात मोठे स्थान मिळवलंय. अनेक जीव वाचवले आहेत, शेकडो हजारो कोटी रुपयांच्या सामग्रीमुळे समुद्रात संरक्षण झालंय, त्यामुळे भारताचे नाव उज्ज्वल झालंय. तटरक्षक दल, नौदलावरील विश्वासात वाढ झालीय. जगातील विविध देशांसोबत भारताचे आर्थिक संबंध वृद्धिंगत होत आहेत, त्यामध्ये याचा मोठा हिस्सा आहे. सैनिकी दृष्टिकोनासोबतच आर्थिक बाबतीतदेखील आजचा दिवस महत्त्वाचा आहे. 21 व्या शतकातील भारताच्या सैन्याची क्षमता अधिक सक्षम आणि आधुनिक व्हावी ही देशाची प्राथमिकता आहे. भारत सर्व ठिकाणी आपल्या हितांचे संरक्षण करण्यात कार्यरत आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ निर्मितीदेखील याचाच एक भाग आहे. सैन्यदलांच्या समन्वयासाठी थिएटर कमांड तयार असल्याचे ते म्हणाले.
कर्नाटकात देशातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना : भारताचे नौदल आता जगात सशक्त नौदल म्हणून ओळखले जात असल्याचे मोदी म्हणाले. संकटावेळी दुसऱ्या देशांवरील परावलंबित्व कमी व्हावे यासाठी देशाची वाटचाल सुरू आहे. 5 हजारांपेक्षा जास्त उपकरणे आता विदेशाऐवजी भारतातच निर्माण केली जातात, त्यामुळे आत्मविश्वासात भर पडते. गेल्या 10 वर्षांत कर्नाटकात देशातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना, लढाऊ विमाने बनवणारा कारखाना सुरू झालाय. नौदलानेदेखील मेक इन इंडिया अभियानाचा मोठा विस्तार केलाय, त्यामध्ये माझगाव डॉकमधील कर्मचाऱ्यांची मोठी भूमिका आहे. भारतीय नौदलात गेल्या 10 वर्षांत 33 जहाजे आणि 7 पाणबुडींचा समावेश झालाय, त्यापैकी 39 भारतातील शिपयार्डमध्ये तयार झालेत. त्यामध्ये विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत आणि आयएनएस अरिघात यांसारख्या न्युक्लिअर पाणबुडीचा देखील समावेश आहे.