मुंबई INDI alliance clean bowled:मुंबईतील शिंदे गटाच्या तीन लोकसभा जागांचा आढावा घेण्यासाठी आज मुंबईतील बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला तिन्ही लोकसभा जागांवरील उमेदवार रवींद्र वायकर, यामिनी जाधव आणि राहुल शेवाळे उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, या तिन्ही जागेवर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी काम सुरू केलं आहे. या तिन्ही जागा आम्ही जिंकणार आहोत. तसंच मुंबईतील सहा जागेवर आमचाच विजय होणार आहे. मुंबईत महायुती षटकार ठोकणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
बैठकीत कशावर चर्चा - मुंबईत तिन्ही जागा धनुष्यबाणाच्या चिन्हावर आम्ही जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसंच या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम सुरू केलेलं आहे. पुढील प्रचार आणि काम कसं करायचं याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. रणनीती ठरवण्यात आली. जे नाराज आहेत त्यांची समजूत काढली जाणार आहे. प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. तसंच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुढील भविष्यासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, या बैठकीला शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर तसंच माजी खासदार संजय निरुपम देखील उपस्थित होते. संजय निरुपम यांचा शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश होणार आहे.
ठाणे, कल्याण, नाशिकमध्ये जोरात काम सुरू -महायुतीत ठाणे, नाशिक या जागांचा तिढा आजपर्यंत सुटला नव्हता. मात्र आज ठाणे इथून नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आम्ही 15 जागांवर निवडणूक लढवत आहोत. ठाणे, कल्याण आणि नाशिक येथे प्रचार जोरात सुरू केलेला आहे. तिथे पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणीही जागा जिंकू. तसंच मुंबईतील आमच्या तीन आणि भाजपाच्या तीन मिळून सहाही जागा जिंकू आणि महाराष्ट्रात महायुती जिंकेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.