नागपूर :देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी शपथ घेतली. आपले लाडके नेते देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्यानं नागपूरच नाही तर संपूर्ण विदर्भातून हजारो देवाभाऊ प्रेमी आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं निघाले. मोठ्या संख्येनं भाजपा कार्यकर्ते हे समृद्धी महामार्गानं पोहोचले, तर रेल्वेनं देखील कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. मात्र ज्यांनी वेळेवर मुंबईला जाण्याचा प्लॅन केला, त्यांच्या खिशाला तिकीट दरवाढीचा फटका बसला आहे.
नागपूर ते मुंबई विमान प्रवासाचे तिकीट भाडे वाढले :नागपूर ते मुंबई विमान प्रवासाचे तिकीट भाडे हे साधारणपणे 4 हजार ते 8 हजार एवढे आकारले जाते. मात्र, देवभाऊंच्या शपथविधी सोहळ्यासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढल्यानं विमान कंपन्यांनी तिकिटांचे दर वाढवले, असा आरोप प्रवाशांकडून करण्यात येतो. गुरुवारी तिकिटांचे दर 10 हजारांच्या घरात गेले. त्यामुळे ज्यांची शपथविधी सोहळ्याला जायची मनोमन इच्छा होती, त्यांना मन मारून नागपुरातचं थांबावं लागलं.
महापरिनिर्वाण दिनामुळे ट्रेन रिझर्व्हेशन फुल्ल :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं हजारो अनुयायी 6 डिसेंबर रोजी मुंबईला अभिवादन करण्यासाठी जातात. त्यामुळे 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये मुंबईला जाण्यासाठी ट्रेनचं रिझर्व्हेशन मिळणं अशक्य आहे. त्यातच देवभाऊंचा शपथविधी होणार असल्यानं केवळ विमान प्रावसाचा पर्याय शिल्लक होता. पण तिकिटांचे दर तिप्पट-चौपट झाल्यानं ते शक्य झालं नसल्याचं मत अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.