मुंबई Mumbai Crime News: हिरेन रमेश भगत उर्फ रोमी भगत या कथित खंडणी प्रकरणात सहाव्या आरोपीला अटक करण्यात आलीय. या आरोपीनं इतर पाच जणांसह मुंबईच्या विकासकाकडून 164 कोटींची खंडणी घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याला पुन्हा आज न्यायालयात हजर केलं असता त्याच्या पोलीस कोठडीत 12 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आलीय.
आरोपीला केली अटक : मुंबईतील नामांकित बांधकाम व्यवसायिका विरोधात दाखल आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार मागं घेण्याच्या नावाखाली आणि बांधकाम व्यावसायिका विरोधात सुरू असलेल्या ईडीच्या तपासात मदत करण्याच्या नावाखाली १६४ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखेने हिरेन भगत (वय ४६) नावाच्या आरोपीला अटक केली. सामाजिक कार्यकर्ता असल्याचा आरोपीचा दावा असून त्यानं बांधकाम व्यावसायिकांकडून २५ लाख रुपये देखील उकळल्याचं तपासात समोर आलं. मंगळवारी आरोपी दिल्लीवरुन मुंबईला आला असता, गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने त्याला अटक केली. या प्रकरणात ही सहावी अटक असून या आधी देखील अश्या प्रकारे आणखी कोणाकडून भगतनं खंडणी वसूल केली आहे का? याचा गुन्हे शाखा कक्ष ९ तपास करत आहे.
१३.६३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त: "मुंबई शहरातील सुप्रसिद्ध विकासकाच्या तक्रारीवरून, गुन्हे शाखेनं पाच आरोपींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत भगतचं नाव पुढं आले. भगत याचं नाव समोर येताच पोलिसांनी त्यास अटक करुन त्यांच्या राहत्या घरी छापा टाकला. भगतच्या घरावर आणि संबंधित ठिकाणी छापे टाकून गुन्हे शाखेनं १३.६३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली," अशी माहिती पोलीस निरीक्षक दया नायक यांनी दिली.