चंद्रपूर Pratibha Dhanorkar News : महाराष्ट्र राज्य हे प्रामुख्यानं कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध असून दिवसेंदिवस कोळसा खाणींची संख्या वाढत चाललीय. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शासनामार्फत अधिग्रहित केल्या जात असतात. परंतु, जमिनी अधिग्रहित केल्या जात असताना अत्यल्प मोबदला मिळत असल्यानं या मोबदल्यात वाढ करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं पत्राद्वारे केलीय. यासंदर्भात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, नागपूर यांना जमिनीच्या मोबदल्यात वाढ करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडं पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
अधिग्रहित जमिनीचा मोबदला अतिशय कमी : "महाराष्ट्र राज्यात नव्यानं अनेक कोळसा खाणी अस्तित्वात येत असून त्यासाठी जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत. तसंच अधिग्रहित केल्या जाणाऱ्या जमिनीचा मोबदला अतिशय कमी असून त्यामध्ये वाढ करुन पडीत जमिनीसाठी 20 लाख रुपये प्रति एकर, बिगर सिंचन जमिनीसाठी 22 लाख रुपये प्रति एकर, तर बागायती किंवा सिंचन शेतीसाठी 24 लाख रुपये प्रति एकर देण्यात यावी," अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं पत्राद्वारे केलीय. यासंदर्भात प्रतिभा धानोरकर यांनी नागपूर इथं वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या कार्यालयात बैठक घेऊन वाढीव मोबदल्यासंदर्भात प्रस्ताव तात्काळ शासनाकडं पाठवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.