छत्रपती संभाजीनगर Maharashtra Foundation Day 2024 :बेळगावसह मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात समाविष्ट करा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. पोलीस आयुक्तालय मैदानात 1 मे निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या जुन्या मागणीला उजाळा देत तो दिवस लवकर पाहायला मिळो, अशी मनोकामना व्यक्त केली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात ठाकरे गट वगळता अन्य पक्षाच्या नेत्यांची गैरहजेरी मात्र चर्चेचा विषय ठरला. आचारसंहिता असल्यानं इतर लोक आले नसावे, अशी सावध प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा :महाराष्ट्र दिनाच्या औचित्यानं ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होताना आनंद होत आहे. मात्र राज्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं आहे. त्यामुळे आजचा दिवस पाहायला मिळाला असून हा महत्वाचा दिवस आहे. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अशी मागणी आहे. भाषेच्या अनुषंगानं राज्यांची निर्मिती झाली. बेळगाव, बिदर, असे अनेक मराठी भाषिक भाग आहेत. त्यामुळं ते महाराष्ट्रात आले पाहिजे. त्यासाठी अनेक वेळा मागणी करण्यात आली, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी देखील त्याबाबत लढा दिला. तो दिवस लवकर यावा, ही इच्छा आहे, असं म्हणत बेळगावसह इतर मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची मागणी यावेळी चंद्रकांत खैरे यांनी केली.