श्रीनगर Tribute To Major Kaustubh Raorane :मेजर कौस्तुभ रावराणे हे ऑगस्ट 2018 मध्ये काश्मीरच्या गुरेझ भागात दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झाले होते. तेव्हा ते अवघ्या 29 वर्षाचे होते. गुरेझ खोऱ्यात हुतात्मा झालेले 36 आरआर (12 गढ रिफ) मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मरणार्थ असीम फाऊंडेशनचा ग्राम विद्युतीकरण प्रकल्पाचं मेजर रावराणे यांच्या आई-वडिलांच्या हस्ते 27 ऑगस्ट रोजी उद्घाटन झालं. यावेळी कौस्तुभ यांच्या आठवणीनं अनेकांना अश्रू अनावर झाले.
मेजर कौस्तुभ रावराणे यांचा काश्मीरमध्ये सन्मान (ETV Bharat Reporter) नियंत्रण रेषेला लागून असलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ खोऱ्यातील रेफ्युजी 1 आणि 2 या दोन दुर्गम खेड्यांनी 27 ऑगस्ट रोजी एक क्रांतिकारक परिवर्तन पाहिलं. कारण, या दिवशी गावातील सर्व 54 घरांना उजळणाऱ्या 'मायक्रो सोलर ग्रीड' प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. गावकऱ्यांनी हा आनंद सोहळा ढोलाच्या तालावर गाणी गावून आणि नाचून साजरा केला. ज्यामुळं हा उद्घाटन सोहळा अविस्मरणीय झाला.
1947 साली काही नागरिक या गावात आले होते. त्यामुळं या गावाला रेफ्युजी असं नाव देण्यात आलं आहे. या ठिकाणी वीज नसल्याची तक्रार या गावकऱ्यांनी केली होती. त्यामुळं या गावात आम्ही प्रकल्प सुरू करण्याचं ठरवलं. या गावाजवळ असलेल्या सीमाभागात मेजर कौस्तुभ रावराणे यांना वीरमरण आलं. त्यामुळं आम्ही या प्रकल्पाला कौस्तुभ रावराणे यांच नाव दिलं आहे.-सारंग गोसावी, असीम फांऊंडेशनचे संस्थापक
मेजर कौस्तुभ रावराणे (सेना मेडल) यांच्या शौर्य आणि बलिदानाच्या स्मरणार्थ या प्रकल्पाला 'प्रोजेक्ट कौस्तुभ' असं नाव देण्यात आलय. मेजर कौस्तुभ रावराणे यांनी 2018 मध्ये गुरेझमध्ये देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं. या प्रकल्पाचं उद्घाटन मेजर कौस्तुभ यांचे आई ज्योती रावराणे, वडील प्रकाश रावराणे यांच्या हस्ते आणि डॉ. सारंग गोसावी (असीम फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत झाले. असीम फाऊंडेशननं साकार केलेल्या या उपक्रमाला फॉक्सवॅगन ग्रुप टेक्नॉलॉजी सोल्युशन्स इंडियानं CSR अंतर्गत निधी दिला आहे.