महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी लवकरच लागू करा;' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पालिका अधिकाऱ्यांना आदेश - BMC KEM HOSPITAL

पालिकेच्या आरोग्य विभागाची महत्त्वाकांक्षी योजना राहिलेल्या झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसीची आठवण एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना करून दिलीय. लवकरात लवकर ही योजना राबवावी, अशा सूचना शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिल्यात.

Deputy Chief Minister Eknath Shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2025, 4:50 PM IST

मुंबई -राजे एडवर्ड म्हणजेच सर्वांच्या परिचयाचे असलेल्या केईएम रुग्णालयाला आज 100 वर्षे पूर्ण झालीत. या निमित्ताने या रुग्णालयाचा वार्षिक अहवाल आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलाय. यसोबतच दृष्टी या स्मरणिकेचेदेखील प्रकाशन करण्यात आलंय. मात्र, या सगळ्यात पालिकेच्या आरोग्य विभागाची महत्त्वाकांक्षी योजना राहिलेल्या झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसीची आठवण एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना करून दिलीय. लवकरात लवकर ही योजना राबवावी, अशा सूचना एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिल्यात.

अरुणा शानबागची तब्बल 41 वर्षे अविरत अन् नि:स्वार्थ सेवा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, केईएम रुग्णालयाने घेतलेले रुग्णसेवेचे व्रत अवघड आहे. इथले डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. केईएम यंदा याच सेवाधर्माची शतकपूर्ती करीत आहे. कुटुंबामध्ये ज्येष्ठ व्यक्तींबद्दल आदरभाव असतो आणि ते आपले आधारवड असतात. त्याचप्रमाणे मुंबई महानगरासह लगतच्या परिसरासाठी हे रुग्णालय एक कुटुंब असून, भक्कम आधारवड आहे. वैद्यकीय तसेच सामाजिक वारसा जपत अत्याधुनिकतेची कासही केईएम रुग्णालयाने धरलीय. आरोग्य क्षेत्राच्या नव्या दिशा आणि आंतरराष्ट्रीय मानके स्थापित केलीत. केईएममधील कर्मचाऱ्यांनी अचेतन अवस्थेतील अरुणा शानबाग यांची तब्बल 41 वर्षे अविरत आणि नि:स्वार्थ सेवा केली, ही जगातील एकमेवाद्वितीय बाब आहे, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलंय.

2024 मध्ये हृदय प्रत्यारोपण : पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, भारतातील पहिली हृदय शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयात 1967 मध्ये झाली आणि 2024 मध्ये येथे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. कोविडच्या काळात येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल भारतीय वायुदलाकडून विमानातून पुष्पवृष्टी करण्यात आली. अवयवदानामध्ये वाखाणण्याजोगे कार्य केल्याबद्दल रुग्णालयाचा काही दिवसांपूर्वीच दिल्लीत गौरव करण्यात आलाय. भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी केईएम रुग्णालयात 1987 मध्ये डॉ. इंदिरा हिंदुजा यांनी घडवली आणि आता इथे रोबोट या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय.

पालिका प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना :याच भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचनादेखील केल्यात. ते म्हणाले की, शताब्दी वर्षानिमित्त रुग्णालयात ‘आयुष्मान शताब्दी टॉवर’ ची उभारणी करावी. या रुग्णालयास अनेक दिग्गजांचा सहवास लाभलेला आहे. त्यामुळे रुग्णालयात वैद्यकीय संग्रहालय म्हणजेच डॉ. म्युझियम सुरू करावे. रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी व्यवस्था करावी. तसेच झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी लवकर लागू करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिलेत.

ABOUT THE AUTHOR

...view details