महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी प्रवीण राऊतांना मोठा दणका, 73.62 कोटींची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त - Patra Chawl Scam - PATRA CHAWL SCAM

PATRA CHAWL SCAM : पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊत यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. त्यामुळं प्रवीण राऊत यांच्या अडचणीत वाढ झालीय.

PATRA CHAWL SCAM
PATRA CHAWL SCAM

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 9:58 PM IST

मुंबईPATRA CHAWL SCAM :गोरेगावातील पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) मोठी कारवाई केलीय. शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विद्यमान खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतसह त्यांच्या निकटवर्तीयांची 73.62 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.

प्रवीण राऊत यांच्या अडचणीत वाढ :जप्त केलेल्या मालमत्तेत पालघर, दापोली, रायगड, ठाणे आणि आसपासच्या परिसरात असलेल्या अनेक जमीनींचा समावेश आहे. याप्रकरणात आतापर्यंत 116.27 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं ईडीनं सांगितलं. त्यामुळं संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

1 हजार 40 कोटींचा गैरव्यवहार : पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या 1 हजार 40 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्ह्याच्या आधारे मनी लॉंड्रिंग कायद्यान्वये ईडी तपास करत आहे. ईडीनं 31 जुलै 2022 रोजी संजय राऊत यांच्या घरासह कार्यालयांवर छापेमारी केली होती. ईडीनं छापेमारीनंतर संजय राऊतांना ताब्यात घेऊन बेलार्ड पिअर कार्यालयात नेत अटक केली होती. तीन महिन्यांहून अधिक काळ जेलमध्ये काढल्यानंतर 9 नोव्हेंबर 2022 रोजी संजय राऊत यांना विशेष पीएमएलए न्यायालयानं जामीन मंजूर केला होता.

प्रवीण राऊतांची मालमत्ता जप्त : ईडीनं याप्रकरणात गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीचे संचालक राकेश कुमार वाधवान तसंच सारंग कुमार वाधवान यांच्या उत्तर गोव्यातील 31.50 कोटी रुपयांच्या दोन स्थावर मालमत्तांवर टाच आणलीय. त्यानंतर ईडीनं प्रवीण राऊत तसंच संजय राऊत यांच्या मालकीची 11.15 कोटींची मालमत्ता जप्त केलीय. त्यानंतर आज ईडीनं प्रवीण राऊत यांना दणका देत त्यांची आणि निकटवर्तीयांची 73.62 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.

हे वाचलंत का :

  1. Patra Chawl Scam : स्वप्ना पाटकर यांच्या घरावर बाटल्या कोणी मारल्या; नितेश राणेंचा सवाल
  2. Patra Chawl Scam : 'जास्त फडफड करु नको'; पत्राचाळ घोटाळ्याच्या साक्षीदार स्वप्ना पाटकर यांच्या घरावर फेकलं धमकीचं पत्र
  3. Patra Chawl Scam: पत्राचाळ घोटाळा प्रकरण, राऊत बंधु वगळता इतर आरोपींच्या गैरहजेरी मुळे आरोप निश्चिती रखडली

ABOUT THE AUTHOR

...view details