मुंबईSanjay Shirsat: मागील काही दिवसांपासून थंडावलेल्या मनसेच्या महायुतीतील समावेशाच्या चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. याला कारण ठरलय ते म्हणजे शिवसेना-शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट. संजय शिरसाट यांनी राज ठाकरेंच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडलं? या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? मनसेच्या महायुतीतील प्रवेशाबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात होतं; मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि भविष्यातील घडामोडींवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे.
राज ठाकरेंशी आमचे जुने संबंध :राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे यांची महायुती सोबतची बैठक यशस्वी झाली अशा चर्चा सुरू झाल्या. लवकरच महायुती सभांमध्ये राज ठाकरे देखील दिसतील असं बोललं जाऊ लागलं. मात्र, कालांतराने या चर्चा थंडावल्या. मात्र आज संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानं पुन्हा एकदा या चर्चा सुरू झाल्या आहेत. या बैठकीबाबत संजय शिरसाट यांनी सांगितलं की, "राज ठाकरे आणि माझे जुने संबंध आहेत. राज ठाकरे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा ते अनेकदा मराठवाड्यात यायचे. तेव्हापासूनचे आमचे स्नेह आहेत. माझी देखील अनेक दिवसांपासूनची राज ठाकरे यांची भेट घेण्याची इच्छा होती. आज तो योग आला. ही वैयक्तिक भेट होती. राजकीय चर्चा झाल्या. मात्र, सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर कोणतीही चर्चा झालेली नाही.