पुणे/वाशिम- IAS Pooja Khedkar''गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत प्रत्येक जण निर्दोष आहे. हे आपलं संविधान सांगतं.'' असं वक्तव्य परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी केले. त्यांनी हे वक्तव्य वाशिमध्ये माध्यमांशी बोलताना केलयं. वादांच्या मालिकांनंतर पूजा यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.
पूजा खेडकर यांनी चुकीची माहिती पसरविली जात असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, "माध्यमांवर माझा विश्वास आहे. माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. जे सत्य आहे, ते सर्वांसमोर येईल. समिती तिचं काम करेल. समितीचा अहवाल आल्यानंतर मी स्वत: माध्यमांना अहवाल देईन. पोलीस चौकशीसाठी आले नव्हते. त्यांना मी काही कामासाठी बोलावले होतं."
वाशिम पोलिसांची पूजा खेडकर यांच्याशी चर्चा:नियमबाह्य पद्धतीनं वागल्याचा आरोप झाल्यानंतर प्रोबेशनरी आयएएस पूजा खेडकर यांची पुणे येथून वाशिमला बदली करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा वाशिम पोलिसांनी पूजा खेडकर यांच्याबरोबर चर्चा केली. पोलीस अधिकाऱ्यांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी निलिमा आरज यांच्यासह इतर दोघींचा समावेश होता. चौकशीला आलेल्या अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्याकडून पूजा खेडकर यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली? हे मात्र कळू शकलेलं नाही.