पुणे IAS Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या त्यांच्या कारनाम्यांमुळे चर्चेत आहेत. पूजा यांचा आता आणखी एक कारनामा समोर आला आहे. दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा खेडकर यांनी घरचा खोटा पत्ता दिल्याचा दावा केला जात आहे. तसंच त्यासाठी त्यांनी बनावट रेशन कार्ड दिल्याची चर्चा आहे.
खोटा पत्ता, बनावट रेशन कार्ड देऊन मिळवलं प्रमाणपत्र : वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिव्यांगचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटा पत्ता दिल्याचा आरोप केला जात आहे. बाणेरला राहात असतानाही पूजा यांनी प्लॉट नंबर 52, देहू-आळंदी, तळवडे हा पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील पत्ता रुग्णालयाला दिला होता. मुळात हा पत्ता थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच पूजा यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या सहकाऱ्याचा होता. पूजा वापरत असलेली ऑडी कार याच कंपनीच्या नावावर आहे.
ऑडी कारची नोंदणीही याच पत्त्यावर :ही थर्मोव्हेरिटा कंपनी तीचं आहे, ज्याच्या नावावर अंबर दिवा लावलेली ऑडी कारची नोंद आहे. इतकंच नव्हे तर याच कंपनीचा गेल्या तीन वर्षांचा 2 लाख 77 हजार 688 रुपयांचा करही थकीत आहे. पिंपरी पालिकेच्या कर संकलन विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
संपूर्ण खेडकर कुटुंब अडचणीत :पूजा खेडकर यांच्या आईवर पिस्तुल प्रकरणात एफआयआर दाखल झाला आहे. आता माजी सरकारी अधिकारी असलेल्या तिच्या वडिलांवरही कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या नावावर सुमारे 40 कोटी रुपयांची संपत्ती आहे. निवृत्तीनंतर 2024 मध्ये पूजा खेडकर यांच्या वडिलांनी अहमदनगर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूकही लढवली. पण यात त्यांचा पराभव झाला. निवडणुकीवेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही त्यांची संपत्ती तब्बल 40 कोटींची असल्याचं आणि शेतीतून 43 लाख वार्षिक उत्पन्न असल्याचंं दाखवलं आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. एसीबीकडून खेडकर कुटुंबाची चौकशी करण्यात येणार आहे. दिलीप खेडकर यांनी जमवलेल्या बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल पुणे लाचलुचपत विभागानं वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. त्यामुळे आता आयकर विभाग खेडकर कुटुंबाची चौकशी करणार आहे.
वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात मुक्कामी : वादात सापडलेल्या पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षण सध्या थांबवण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून त्यांना त्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. पूजा खेडकर यांना मसूरीला ट्रेनिंग सेंटरला हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूजा यांचा प्रशिक्षण कालावधी रद्द केल्यानंतर त्यांचा सध्या वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात मुक्काम आहे. आज त्या वाशिम येथून निघण्याची शक्यता आहे. तेथून पूजा खेडकर थेट दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. नागपूर येथून त्या विमानाने दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. प्रशिक्षण कालावधी रद्द झाल्यानंतर अद्याप त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रशिक्षण कालावधी रद्द झाल्यानंतर त्यांचं शासकीय वाहन काढून घेण्यात आलं आहे. त्यामुळं पूजा या खासगी वाहनानं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या सहा दिवसात शासकीय विश्राम गृहाच्या उपहारगृहाचे सुमारे सहा हजार रुपयांचं बिल त्यांनी भरलं आहे. दरम्यान, पूजा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचा
- पूजा खेडकर यांच्याविरोधात सर्वप्रथम माहिती देणारे अधिकारी अडचणीत? वाशिम पोलिसात मानसिक छळाची तक्रार - IAS Pooja Khedkar
- IAS पूजा खेडकर यांना दणका; प्रशिक्षण स्थगित करत मसुरीला बोलावलं - IAS Pooja Khedkar Called Mussoorie
- वाशिम पोलिसांकडून चौकशी नाही, मीच त्यांना बोलावलं होतं-पूजा खेडकर - IAS Pooja Khedkar
- पूजा खेडकर यांचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन; 'YCM' रुग्णालयातूनसुद्धा मिळवलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र - IAS Pooja Khedkar