पुणेPooja Khedkar IAS Case:ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोयी-सुविधांची मागणी करणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत सतत धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. सुरुवातीला दिव्यांग असलेलं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण, त्यानंतर सहा वेळा मेडिकल टेस्टला गैरहजर राहणं आणि 17 कोटी रुपयांची संपत्ती असूनही त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससीला दिलेल्या माहितीत आपण मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं सांगितलंय. या प्रकरणावर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिलीय.
चौकशीसाठी समितीची स्थापना :पूजा खेडकर प्रकरणी चौकशीसाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच ही समिती दोन आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रायलानं अतिरिक्त सचिव दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. यात पूजा खेडकर यांची यूपीएससी मध्ये झालेली निवड आणि इतर संबंधित बाबींची समितीकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.
- पदावरून काढलं पाहिजे :पुण्यात रामदास आठवले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी रामदास आठवले म्हणाले की, "पूजा खेडकर यांनी चुकीची माहिती देऊन आरक्षणाचा फायदा उठवला असेल तर ते चुकीचं आहे. याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. यात त्या दोषी आढळल्यास त्यांना त्या पदावरून काढलं पाहिजे."
निवडणुकीत 10 ते 12 जागा मिळाव्यात : यावेळी रामदास आठवले म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीत रिपबल्किन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत. तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचं काम केलं. त्यामुळं येत्या विधानसभा निवडणूकीत किमान 10 ते 12 जागा आम्हाला मिळाव्यात. तसेच ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण न होता मराठ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा. तसेच क्रिमिलेयरची मर्यादादेखील 8 लाखांवरुन 12 लाख रुपये करावी," अशी मागणी यावेळी त्यांनी केली.