मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (मंगळवार) शेवटचा दिवस आहे. तर 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. दरम्यान, माहीम विधानसभा मतदारसंघ सध्या मोठ्या चर्चेत आलाय. इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर शिवसेना (ठाकरे गटाकडून) महेश सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दुसरीकडे शिवसेना (शिंदे गटाकडून) सदा सरवणकर यांनीही आज अर्ज दाखल केला. पण तो अर्ज शिंदेंच्या पक्षाकडून आहे की अपक्ष याबाबत अद्यापही संभ्रम आहे. सदा सरवणकर यांनी इथून उमेदवारी मागे घ्यावी, असं शिवसेना पक्षातून अनेक नेत्यांनी म्हटलं होतं. तसेच त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. परंतु अखेर ते निवडणूक लढवण्यावर ठाम असून, आज त्यांनी अर्ज दाखल केलाय.
मैत्रीपूर्ण लढत व्हावी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्यामुळं त्यांना महायुतीनं विजयी करावं. येथे महायुतीने कोणताही उमेदवार देऊ नये, असं शिवसेनेसह भाजपा नेत्यांनीदेखील म्हटलं होतं. "राज ठाकरे यांचे आमच्याशी पारिवारिक संबंध आहेत आणि एक आमच्या कुटुंबाचा भाग आहेत. म्हणून जर अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असतील तर त्यांना आपण सर्वांनी मिळून विजयी का करू नये? अशी माझी इच्छा आहे, असंही मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी म्हटलं होतं. मात्र माझा सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला विरोध नाही. परंतु इथे मैत्रीपूर्ण लढत आणि महायुतीने अमित ठाकरेंना विजयी करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करेन, असंही शेलार यांनी म्हटलं होतं." यानंतर दीपक केसरकर आणि उदय सामंत यांनीही सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावा, असं म्हटलं होतं. मात्र आपण उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम असून, तिथून निवडणूक लढवणारच, असं सदा सरवणकर यांनी म्हटलंय.
मी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच :दबावाला बळी पडणार नाहीदुसरीकडे आज सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षाकडून त्यांची मनधरणी आणि उमेदवारी अर्ज मागे घ्यावी यासाठी समजूत काढण्यात येते होती. मंत्री दीपक केसरकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी सदा सरवणकर यांच्याशी फोनवरून संवाद साधला. तसेच अर्ज मागे घेण्यासाठी समजूत काढली होती. परंतु पक्षातील कुणाचेही सदा सरवणकर यांनी ऐकले नाही. जरी माझ्यावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव असला तरी मी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच, असं सदा सरवणकरांनी म्हटलंय. त्यामुळं त्यांनी आज दोन अर्ज दाखल केलेत असंही बोललं जातंय. मात्र त्यांनी शिवसेना पक्षाकडून अर्ज दाखल केलाय की, अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
"मी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच", सरवणकरांचा उमेदवारी अर्ज दाखल, अपक्ष लढणार का? - ASSEMBLY ELECTION 2024
सदा सरवणकर यांनी माहीममधून उमेदवारी मागे घ्यावी, असं शिवसेना पक्षातून अनेक नेत्यांनी म्हटलं होतं. तसेच त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.
सदा सरवणकर (ETV Bharat File Photo)
Published : Oct 29, 2024, 2:54 PM IST