छत्रपती संभाजीनगर : घृष्णेश्वराचं दर्शन करुन शिर्डीला परतणाऱ्या हैदराबादच्या भाविकांवर काळानं घाला घातला. या भाविकांची जीप उसाच्या ट्रॉलीवर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 4 भाविकांचा मृत्यू झाला असून 11 भाविक जखमी झाले आहेत. ही घटना गंगापूर वैजापूर महामार्गावरील तांबोळगोटा फाटा इथं बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. प्रेमलता श्यामशेट्टी (56), प्रसन्न लक्ष्मी ( 48), वैद्विक श्यामशेट्टी (6 महिने), अक्षिता श्यामशेट्टी (20) अशी अपघातात ठार झालेल्या भाविकांची नावं आहेत.
भाविक घृष्णेश्वराचं दर्शन घेऊन परत जात होते शिर्डीला :हैदराबाद इथले 14 भाविक शिर्डी इथं दर्शनासाठी आले होते. यावेळी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेऊन ते बुधवारी सकाळी जीप क्रमांक एसएच 17, बीडी 1897 नं वेरुळ लेणी पाहून घृष्णेश्वराचं दर्शनाला गेले. घृष्णेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी गंगापूर मार्गे शिर्डीला परतीचा रस्ता धरला. मात्र बुधारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास महालगावकडं उस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला या भाविकांच्या कारनं जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला, तर 11 भाविक जखमी झाले.
चार भाविक ठार, 11 जण जखमी :या अपघातात प्रेमलता श्यामशेट्टी (56), प्रसन्न लक्ष्मी ( 48), वैद्विक श्यामशेट्टी (6 महिने), अक्षिता श्यामशेट्टी (20) या चार जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी आहेत. यात शिर्डी इथला कारचालक रामा वसंत कापुरे, रामबाबू बज्जुरी (43), प्रणाली (12), शेवंती (37), दीपक (7), व्यंकय्या (38), शरण्या श्रीनिवास (17) रमादेवी (55), कृष्णमूर्ती (65), यामिनी (35) आदींचा समावेश आहे. या अपघातातील जखमी ठार झालेले सगळे भाविक हैदराबाद इथले राहणारे आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.