चंद्रपूरMoushi Village Murder Case: जिल्ह्यात खुनाच्या घटनेत चिंताजनक वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना कुऱ्हाडीनं संपविल्याची घटना कोरपना तालुक्यात घडली. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच एका नराधमानं कुऱ्हाडीनं वार करत आपल्या पत्नीसह दोन मुलींना झोपेतच संपवले. ही घटना आज रविवारी (3 मार्च) उघडकीस आली. नागभीड तालुक्यातील मौशी या गावातील ही थरारक घटना आहे. अंबादास लक्ष्मण तलमले (वय 45) असं नराधमाचं नाव आहे.
आरोपीला होते दारूचे व्यसन:प्राप्त माहितीनुसार, आरोपी अंबासास तलमले हा काहीच काम करत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याचे नेहमीच घरी खटके उडत होते. त्याला पत्नी अलका अंबादास तलमले (वय 40), प्रणाली (वय 19) आणि तेजस्वीनी (वय 16) अशा दोन मुली आणि अनिकेत तलमले हा मुलगा होता. मुलगा अनिकेत दहावीत कृषक विद्यालय मौशी येथे शिकत असून तो दहावीचे पेपर देत आहे. तर मृतक तेजस्विनी हीसुद्धा कृषक विद्यालय मौशी येथे ती बारावीची परीक्षा देत होती. आरोपी अंबादास तलमले हा नेहमी दारू पिऊन पत्नी आणि मुलींना त्रास द्यायचा. दारू पिण्यासाठी वारंवार पैश्याची मागणी करायचा. आरोपीची पत्नी आणि दोन्ही मुली मोलमजुरी करायच्या.
झोपेत तिघांनाही संपवले:अंबादासच्याघरी दररोज कौटुंबिक वाद व्हायचे. काल त्याची पत्नी आणि मुली झोपल्या असताना यावेळी आरोपीने त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यात या तिघींचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आली.