मुंबई MSRTC Employees Salary Hike: गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलं होतं. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं दोन दिवसात महामंडळाचं 14 ते 15 कोटी रुपयांचं नुकसान झालं. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या तोंडावर हा संप पुकारल्यामुळं चाकरमान्यांना आणि गणेशभक्तांना गावी जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला. तर वेतनवाढीसह आपल्या विविध मागण्यावर कर्मचारी ठाम राहिले. परिणामी बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबतच्या झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात 6500 हजारांची वाढ करुन दिल्यामुळं त्यांनी संप मागे घेतला. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीमुळं राज्याच्या तिजोरीवर किती कोटीचा भार पडणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
अर्थतज्ञ विश्वास उटगी यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) राज्याच्या तिजोरीवर 46 हजार कोटीचा बोजा : मागील काही दिवसांपासून राज्य सरकार विविध लोक कल्याणकारी योजना आणत आहे. 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या एका योजनेमुळं राज्याच्या तिजोरीवर तब्बल 46 हजार कोटीचा बोजा पडत आहे. असं असतानाच आता एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्यात आलीय. अगोदरच राज्य सरकारवर 8 हजार कोटींचं कर्ज असताना, विविध योजना आणि पगारवाढ ही केवळ निवडणुकीच्या तोंडावर मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी केली असल्याचं बोललं जातंय.
तिजोरीवर किती कोटीचा भार? : "गेल्या दोन दिवसात राज्यभर 90 हजार एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. आपल्या विविध मागण्यासाठी तसेच मूळ मागणी वेतनवाढ होती. यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. पण आता सरकारनं या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडेसहा हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळं साधारण अंदाजे 58 कोटी 50 लाख रुपये मासिक खर्चात वाढ होणार असून, प्रत्येक महिन्याला राज्याच्या तिजोरीवर 58 कोटी 50 लाख रुपये एवढा भार पडणार आहे", अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
अर्थतज्ञांची प्रतिक्रिया : याविषयी अर्थतज्ञ विश्वास उटगी म्हणाले की, "मुळात या सरकारकडं पैसा नाही. तरी सुद्धा मोठ मोठ्या योजनांच्या घोषणा सरकारकडून केवळ निवडणुकीच्या तोंडावर केल्या जात आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांना 6500 रुपयांची पगारवाढ सरकारनं दिली खरी, पण याचा मोठा ताण राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. साधारण प्रत्येक महिन्याला 58 कोटी 50 लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. याचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येईल. तसंच आगामी काळात जे सरकार येईल, त्याला राज्याचा गाडा हाकताना याचा त्रास होईल."
सरकार बॅकफूटवर? :'मुख्यमंत्री लाडकी बहीण' या योजनेला राज्यभर उदंड प्रतिसाद मिळत होता. पण 20 ऑगस्ट रोजी बदलापूर अत्याचार घटना आणि यानंतर एकाच आठवड्यात मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे. या दोन घटनेमुळं सरकार बॅकफूटवर गेलंय. असं असताना पुन्हा एकदा कुठलीतरी मोठी योजना आणून किंवा एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊन सरकार कसं तळागाळातील, गोरगरिबांचे आहे. हे दाखवण्याचा प्रयत्नही सरकारकडून होताना दिसत आहे. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या तोंडावर केलेली पगारवाढ ही सरकारच्या पथ्यावर पडेल का? हे आगामी विधानसभा निवडणुकीतच दिसेल.
हेही वाचा -
- एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला, मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत तोडगा, वाचा 'किती' दिली पगारवाढ - ST employees called off strike
- एसटी कर्मचारी संपामुळे १५ कोटींचे नुकसान, मुख्यमंत्री आज काढणार तोडगा - ST Bus strike second day
- एसटी संपाचा फटका कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना; सरकारनं केली 'ही' सोय - ST Employees Strike