महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावधान! होळीत 'हे' काम केल्यास थेट होऊ शकतो तुरुंगवास, काय आहे बीएमसीची नियमावली? - Holi 2024 - HOLI 2024

Holi 2024 : होळीच्या निमित्तानं दरवर्षी वृक्षतोड झाल्याचं पाहायला मिळतं. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिकेच्या प्रशासनानं वृक्षतोडीसंदर्भात आदेश काढले आहेत. तसंच वृक्षतोड न करण्याचं आवाहनही करण्यात आलंय.

सावधान! होळीसाठी वृक्षतोड केल्यास महापालिका करणार कारवाई, तुरुंगवासाची देखील तरतूद; काय आहे नियमावली?
सावधान! होळीसाठी वृक्षतोड केल्यास महापालिका करणार कारवाई, तुरुंगवासाची देखील तरतूद; काय आहे नियमावली?

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 22, 2024, 9:18 AM IST

Updated : Mar 22, 2024, 9:24 AM IST

मुंबई Holi 2024 : होळीला अवघे दोन दिवस उरले आहेत. मात्र होळीच्या वेळी गोंधळ घालणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाची करडी नजर असणार आहे. होलिका दहनाच्या तयारीत गुंतलेल्या लोकांना महापालिकेच्यावतीनं विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. होलिका दहनसाठी कोणी बेकायदेशीर वृक्षतोड केल्यास 5 हजारांचा दंड किंवा 1आठवडा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यासंदर्भात महापालिका प्रशासनानं आदेश जारी केलाय. त्यामुळं मुंबईकरांनो, होळी साजरी करताना महापालिकेच्या नियमांचं पालन करा असं आवाहन महापालिकेनं केलंय.

वृक्षतोड न करण्याचं आवाहन : याबाबत महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की, येत्या रविवारी म्हणजेच दिनांक 24 मार्च 2024 रोजी साजरा होणाऱ्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करु नये. आमच्या कर्मचाऱ्यांना एखाद्या ठिकाणी अनधिकृतपणे झाडे तोडल्याचं आढळून आल्यास त्याबाबत महापालिकेकडून पोलीस तक्रार केली जाईल. तसंच ‘होळी’च्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचं आढळल्यास सतर्क नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना व स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावं. अथवा महानगरपालिकेच्या '1916' या 'टोल फ्री' क्रमांकावर संपर्क करावा, अशी माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक आणि वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य सचिव जितेंद्र परदेशी यांनी दिलीय.

काय होईल शिक्षा : पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, 1975 च्या कलम 21 अन्वये, वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतंही झाड तोडण्यास किंवा तोडण्यास कारणीभूत होणं हा अपराध आहे. अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तिला कमीत कमी रुपये 1 हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यासह एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षादेखील होऊ शकते. आपल्या परिसरात आपल्या आजूबाजूला असलेली निसर्ग संपदांचं जतन करून जोपासणं हे आपलं कर्तव्य आहे. ही झाडेच तुम्हाला आम्हाला आणि संपूर्ण मुंबईला प्राणवायू देण्याचं काम करतात. त्यांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळं सर्व मुंबईकरांनी महानगरपालिकेला आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं, असं आवाहन उद्यान अधीक्षक परदेशी यांनी केलंय.

हेही वाचा :

  1. Nick Jonas to play Holi in India : निक जोनस पत्नी प्रियांका चोप्रा आणि मुलगी मालतीबरोबर भारतात साजरी करणार होळी
Last Updated : Mar 22, 2024, 9:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details