ठाणे :उल्हासनगर येथील कॅम्प नंबर चारच्या व्हीनस चौकात आज (24 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एका मद्यधुंद कारचालकानं 9 जणांना धडक दिली. या घटनेत 4 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कारचा चक्काचूर :मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. कार चालक व्हीनस चौक परिसरातून कार भरधाव वेगानं घेऊन जात असताना त्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा आणि काही नागरिकांना जोरदार धडक दिली. कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्यानं हा अपघात झाल्याची माहिती अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीनं दिली. यातील दोघांवर खासगी तर इतर दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या अपघातात कार चालकासह 4 जण गंभीरित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.