नागपूर Hit and Run in Nagpur : गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात 'हिट अँड रन'च्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळतंय. असं असतानाच आता रविवारी रात्री एका मद्यधुंद कारचालकानं फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झालाय. रात्री उशिरा वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दिघोरी चौकाजवळ ही घटना घडली आहे. कारचालकाला अटक करण्यात आलीय.
नेमकं काय घडलं? :दिवसभर शहरातील विविध भागात फुटपाथवर खेळणी विक्रीचा व्यवसाय केल्यानंतर रोजच्या दिनक्रमानुसार काही लोक फुटपाथवर झोपले होते. उमरेडच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव कारचालकाचं कार वरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार थेट फुटपाथवर चढली. यावेळी फुटपाथवर झोपलेले 8 जण कार खाली चिरडले गेले. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तसंच यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचं सांगण्यात आलंय.