नागपूर Maskarya Ganesh Festival In Nagpur : राज्यात गणेशोत्सव जरी आता संपला असला, तरी विदर्भात मात्र, पुढील काही दिवस हाडपक म्हणजेच 'मस्कऱ्या' गणपतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर 'हाडपक' गणपतीची स्थापना केली जाते. महत्वाचं म्हणजे पितृपक्षात 'हाडपक्या' गणपतीची स्थापना केली जाते. पितृपक्षात जेव्हा शुभकार्य निषिद्ध मानलं जाते, त्यावेळी विदर्भातील 'हाडपक' गणेशोत्सव साजरा केला जातो. विदर्भात गेल्या 237 वर्षांपासून हाडपक गणेशोत्सव साजरी करण्याची परंपरा आहे. विदर्भात मस्कऱ्या गणपतीची परंपरा 237 वर्षे जुनी आहे. 'मस्कऱ्या' गणपतीची स्थापना ही समशेर बहाद्दर श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले ऊर्फ चिमणाबापू यांनी वर्ष 1787 मध्ये केल्याचे ऐतिहासिक दाखले आढळतात.
मस्कऱ्या गणेशोत्सवाचा इतिहास :इ स 1787 मध्ये श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले (उर्फ चिमणाबापू) यांनी मस्कऱ्या (हडपक्या) या उत्सवाचं आयोजन केलं. या मागील थोडक्यात इतिहास असा, की शूर लढवय्ये सरकार समशेर बहाद्दूर श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले (उर्फ चिमणाबापू) हे अन्याया विरोधात लढत असताना ते बंगालच्या स्वारीवर होते. बंगालवर विजय मिळवून परत येईस्तोवर कुळाचारी गणपतीचं विसर्जण झालं होतं. बंगालवर विजय मिळवण्याचा आनंद साजरा करण्याकरता 'मस्कऱ्या' (हडपक्या) गणपतीची स्थापना करुन त्यात विविध नकला लावण्या, खडी गम्मत या सारख्या कार्यक्रमाचं आयोजन करुन हा आनंदोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात आला.