अमरावती - समाजानं वर्षानुवर्ष नाकारलेल्या आणि गावाबाहेर तांड्यावर आयुष्य जगणाऱ्या कुटुंबातील बालकांचा शिक्षणाशी संबंध अभावानेच येतो. अशा परिस्थितीत या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचं खास साहित्य संमेलन अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या मंगरूळ चव्हाळा या गावात होत आहे. भटक्या जमातीच्या नव्या पिढीला शिक्षणाची कवाडे खुली करण्यासाठी प्रयत्न करणारे मतीन भोसले यांनी आपल्या प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळा येथे दोन दिवसीय बाल साहित्य संमेलन हा आगळावेगळा ऐतिहासिक सोहळा आयोजित केलाय.
मुलांमध्ये रुजवली साहित्य कलेची आवड -चोरी करणं, भीक मागणं असंच आयुष्य पिढ्यान पिढ्या ज्यांच्या नशिबी आलं अशा समाजातील मुलांना गेल्या दहा वर्षांपासून शिक्षणाची गोडी लावत मंगरूळ चव्हाळा या गावालगत मतीन भोसले यांनी प्रश्नचिन्ह या नावानं निवासी शाळा सुरू केली. आज अक्षरज्ञानासोबतच सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे नेमकं जग काय आहे, आयुष्य कशाला म्हणतात, याची जाणीव होणाऱ्या चिमुकल्यांमधील कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश समोर ठेवून या बालकांचं खास साहित्य संमेलन आयोजित करण्याची अनोखी कल्पना मतीन भोसले यांना सुचली. आता दोन दिवसीय बाल साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांमधील कलागुणांना खास दालन उपलब्ध झालं. हा सोहळा म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि कला क्षेत्रातील नव्या जगाची ओळख व्हावी असा आहे. यानिमित्ताने नामवंत कवी आणि कलावंत आमच्या शाळेत आलेत हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचं मतीन भोसले "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हणाले.
तांड्यावरच्या चिमुकल्यांमध्येही अनोखे कलागुण- खरंतर साहित्य संमेलन म्हटलं की एक विशिष्ट वर्ग डोळ्यासमोर येतो. आमच्या प्रश्नचिन्ह निवासी आदिवासी आश्रम शाळेचे संचालक मतीन भोसले यांच्या संकल्पनेतून बालसाहित्य संमेलन हा अनोखा सोहळा तांड्यावरच्या चिमुकल्यांमध्ये असणाऱ्या कलागुणांना उजाळा देणारा आहे, असं शाळेतील शिक्षिका लक्ष्मी खांडेकर "ईटीव्ही भरात" शी बोलताना म्हणाल्या. हे पहिलं अशा प्रकारचं राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलन असून समाजानं दुर्लक्षित केलेल्या घटकांमधील चिमुकल्यांमध्ये देखील सूप्त कला गुण दडले आहेत, त्यांना देखील त्यांचं चांगलं भविष्य घडवण्याची संधी आहे याची जाणीव या बाल साहित्य संमेलनाद्वारे होते आहे. हे खरंतर मोठं यश असल्याचं देखील लक्ष्मी खांडेकर म्हणाल्या.