महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूरचा 'शाही दसरा' दिमाखात साजरा, ऐतिहासिक दसरा चौकात करवीरवासीयांनी लुटलं सोनं - KOLHAPUR SHAHI DASARA

छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा दिमाखात साजरा झाला. यावर्षीचा शाही दसरा महोत्सव भव्य स्वरुपात आणि अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.

KOLHAPUR SHAHI DASARA MELAVA
कोल्हापूरचा शाही दसरा दिमाखात साजरा (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2024, 9:31 PM IST

Updated : Oct 12, 2024, 9:38 PM IST

कोल्हापूर : छत्रपतींची राजधानी करवीर असणाऱ्या नगरीत पारंपरिक विजयादशमीचा शाही दसरा (Kolhapur Shahi Dasara) सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात दिमाखात साजरा झाला. दरवर्षीप्रमाणं आज शनिवारी (12 ऑक्टोबर) सूर्यास्तावेळी म्हणजेच सायंकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी मावळत्या सूर्यास्ताच्या साक्षीनं शमीपूजनाचा सोहळा खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते व संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे यशराजराजे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

करवीरवासीयांची सोन लुटण्यासाठी झुंबड : देशात म्हैसूरनंतर ऐतिहासिक परंपरा असलेल्या करवीर संस्थानचा शाही दसरा आज संपन्न झाला. नवीन राजवाड्यापासून दसरा चौक मैदानापर्यंत निघालेल्या शाही मिरवणुकीत सजवलेले मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, शिवकालीन युद्धकलांची व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीनं निघालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही लवाजम्यात निघालेल्या मिरवणुकीनं उपस्थित नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. नवीन राजवाड्यातून खास मेबॅककारमधून खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, संभाजीराजे छत्रपती मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजे छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्य या शाही कार्यक्रमासाठी उपस्थित होते.राज घराण्याच्या मानकर यांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडल्यानंतर करवीरवासीयांची सोन लुटण्यासाठी झुंबड उडाली होती. यानंतर राज घराण्यातील सदस्यांना सोनं देऊन हा पारंपारिक सोहळा संपन्न झाला.

कोल्हापूरचा शाही दसरा दिमाखात साजरा (Source - ETV Bharat Reporter)

पालखी मार्गावर लोकसंस्कृतीचं दर्शन :या सोहळ्यावेळी भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर कोल्हापूरच्या राजघराण्याची कुलस्वामिनी, तुळजाभवानी आणि करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या पालख्यांसोबत राजेशाही मिरवणूकीतून कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडलं. मिरवणूक मार्गाच्या दोन्ही बाजूला एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जि.प.चे सीईओ कार्तिकेयन एस.यांच्यासह सरदार, इनामदार घराण्यातील प्रमुख मानकरी, सरकारी अधिकारी उपस्थित होते.

राज्य महोत्सवाचा दर्जा असूनही निधी नाही : कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. यामुळं राज्य सरकारनं या महोत्सवाला 'राज्य महोत्सवाचा' दर्जा दिला होता. यासाठी राज्य सरकारकडून 2 कोटींच्या निधीची तरतुदही करण्यात आली. गेली 2 वर्ष हा निधी शाही दसरा महोत्सव समितीला मिळत‌ आहे. मात्र, यंदा राज्य सरकारनं शाही दसरा महोत्सवाकडे पाठ फिरवल्याची चर्चा करवीर वासियांमध्ये सुरू होती.

हेही वाचा

  1. "प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार...", दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
  2. "ठासून दोन वर्ष पूर्ण केली, मला हलक्यात घेवू नका"; दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री कडाडले
  3. "आचारसंहिता लागल्यावर भूमिका मांडणार, उलथापालथ करावी लागणार", मनोज जरांगे पाटलांचा इशारा
Last Updated : Oct 12, 2024, 9:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details