अमरावती Hirkani Kaksha In Amravati University : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अमरावतीसह अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम अशा पाच जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. तर अनेक विद्यार्थिनी लग्नानंतरदेखील आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी इथं येत असतात. बाळ झाल्यानंतर देखील शिक्षण सुरू ठेवणाऱ्या या विद्यार्थिनींसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनं विद्यापीठ परिसरात 'हिरकणी कक्ष' उभारण्याचा निर्णय घेतला. नंतर या निर्णयाला सिनेटने मंजुरी दिली. त्यानंतर विद्यापीठातील परीक्षा विभागासमोर हा 'हिरकणी कक्ष' सुरू करण्यात आला. दरम्यान, महिनाभरापूर्वी या हिरकणी कक्षाची सुरुवात करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रभारी परीक्षा नियंत्रक मोनाली तोटे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
असे आहे हिरकणी कक्ष : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागासमोर महिला सुविधा केंद्राच्या सुसज्ज इमारतीमध्ये 'हिरकणी कक्ष' सुरू करण्यात आलाय. या कक्षामध्ये विद्यार्थिनी मातांना आपल्या बाळांना घेऊन सहज बसता येईल अशी सुविधा करण्यात आली आहे. तसंच या ठिकाणी कुलर, फ्रीज, पिण्याचे पाणी, स्वतंत्र शौचालय यांची सुविधा देखील करण्यात आली आहे. या ठिकाणी केवळ विद्यार्थिनी माता आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या महिलेलांच प्रवेश दिला जाईल. तसंच या कक्षात येणाऱ्या माता महिलांची नोंद देखील ठेवली जाणार आहे.