पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या दोन महिला पोलिसांनी कर्तव्यावर असताना प्रसव वेदनेने त्रासलेल्या एका गरोदर महिलेची सुखरूप प्रसुती केलीय. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या दोन्ही महिला पोलिसांना गौरवलं आहे. अंमलदार नीलम चव्हाण (Neelam Chavan) आणि रेश्मा शेख (Reshma Shaikh) अशी या हिंजवडी वाहतूक विभागात काम करणाऱ्या महिला पोलिसांची नावं आहेत.
काय आहे घटना?: रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास वाकड नाका येथे हिंजवडी वाहतूक विभागात कार्यरत असणाऱ्या अंमलदार नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांना एका महिलेला प्रसुती वेदना होत असल्याचं समजलं. या दोघीही वेळ न दवडता तत्काळ गरोदर असलेल्या राजश्री माधव वाघमारे यांच्या मदतीला धावून आल्या. रुग्णवाहिका आणि डॉक्टर येण्यास विलंब होत असल्यानं असह्य वेदना होत असलेल्या राजश्री यांना रस्त्याला कडेला असलेल्या खोलीच्या आडोशाला नेलं आणि महीलेला धीर दिला आणि सुखरूप प्रसुती केल्याचं महिला पोलीस नीलम चव्हाण यांनी सांगितलं.