मुंबई Heavy Rain Start In Mumbai :मागील तीन दिवस उसंत घेतलेल्या पावसानं देशाच्या आर्थिक राजधानीत पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवार 15 जुलै ते बुधवार 17 जुलै या तीन दिवस पावसानं दडी मारल्याचं चित्र होतं. मात्र, आज 18 जुलैच्या पहाटेपासून मुंबईत पावसाचं पुन्हा एकदा दमदार आगमन झालं आहे. आज पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाचा उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नसला तरी, दादर, शिव या ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर मध्य रेल्वेवरील लोकल दहा ते पंधरा मिनिटांनी उशीरा धावत आहेत.
सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात :आज पहाटेपासून मुंबईत मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. शहरातील काही भागात एक-दोन हलक्या सरी कोसळल्या. बेस ऑब्झर्व्हेटरी सांताक्रूझमध्ये गेल्या 24 तासात 1 मिमी पावसाची नोंद झाली, तर कुलाबा इथं 10 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 18 जुलै ते 20 जुलै 2024 या चार दिवसात मुंबईत मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. आज सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसात आकाश ढगाळ राहील आणि काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.