महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रो कबड्डीच्या अकराव्या पर्वात हरियाणा स्टिलर्स विजेते; पाटणा पायरेट्स संघावर ३२-२३ अशी मात - PRO KABADDI 2024

प्रो कबड्डी २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना पटणा पायरेट्स आणि हरियाणा स्टीलर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने शानदार विजय मिळवला आहे.

Pro Kabaddi 2024
प्रो कबड्डी २०२४ (Fil Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2024, 10:52 PM IST

पुणे : प्रो कबड्डीच्या अकराव्या पर्वात हरियाणा स्टिलर्सने विजेतेपदाला गवसणी घातली आहे. बचावपटू महंमद रेझा शाडलुईच्या भक्कम बचावापुढे पाटणा पायरेट्सचे आव्हान ३२-२३ असे सहज परतवून लावले. हरियाणाचे हे पहिलेच विजेतेपद ठरले.

हरियाणा स्टिलर्स विजेते : संपूर्ण सामन्यात हरियाणा स्टिलर्सच्या बचाव फळीने पाटणा पायरेट्सच्या चढाईपटूंची कसोटी पाहिली. देवांक आणि अयान या चढाईपटूंवर पाटणा अवलंबून होते. पण, आज त्यांचे दोन्ही शिलेदार हरियाणाचा बचाव भेदू शकले नाहीत आणि बचावफळी शिवम, विनयला रोखू शकले नाहीत. सामना एकवेळ एकदोन गुणांच्या फरकाने सामना सुरु होता. मात्र, सामना संपण्यास सात मिनिटे असताना हरियाणा स्टिलर्स संघाने चढवलेला लोण सामन्याचा निकाल ठरवण्यास पुरा ठरला. या लोणनंतर हरियाणा संघाने पूर्ण वर्चस्व राखत विजेतेपद निसटणार नाही, याची काळजी घेतली. शाडलुईने बचावात मिळविलेले ७ गुण लीगच्या इतिहासात अंतिम फेरीतील सर्वाधिक ठरले. चढाईत शिवमने ९ आणि विनयने ७ गुण मिळवून आपली जबाबदारी चोख बजावली. तुलनेत पाटणाकडून गुरदीपच्या हायफाईव्ह खेरीज सांगण्यासारखे काहीच घडले नाही. सर्वाधिक चढाईचे गुण मिळविणाऱ्या देवांकने एका हंगामातील गुणांचे त्रिशतक गाठले. मात्र, त्याला पाच गुणांच्या पुढे जाता आले नाही. अयानही केवळ ३ गुण मिळवू शकला. येथेच पाटणाचे अपयश स्पष्ट झाले.

हरियाणा संघाला १५-१२ आघाडी राखता आली : सामन्याचा पूर्वार्ध हरियाणा स्टिलर्सच्या नावावर राहिला. पहिल्या चढाईपासून त्यांनी आपल्या बचावाचा दरारा निर्माण केला होता. महंमद रेझा शाडलुईने यात महत्वाची भूमिका बजावली. त्याला पुढे पहिल्या सत्रात जयदीप आणि संजयची सुरेख साथ मिळत होती. पाटणा संघ मात्र आपल्या चढाईपटूंवर अवलंबून असल्यानं त्यांना सामन्यात लय शोधण्यास संधी मिळत नव्हती. शिवम पठारेने आपल्या चढाया अचूक करताना पाटणाच्या बचावफळीला चांगले आव्हान दिले. शुभम शिंदे आणि अंकित यांच्यावर त्यांच्या बचावाची मदार होती. पण, शुभमला आज आपला लौकिक दाखवता आला नाही. अंकितचाही तेवढा प्रभाव पडत नव्हता. मात्र, गुरुदीपने आज जबाबदारी घेताना संघाचे आव्हान राखण्याचा प्रयत्न केला. देवांक आणि अयान या दोन्ही चढाईपटूंना हरियाणाच्या बचावपटूंनी स्थिरावू न दिल्यामुळं मध्यंतराला हरियाणा संघाला १५-१२ आघाडी राखता आली.

विनयने आणलेले दोन गुण महत्वाचे ठरले: उत्तरार्धात दोन्ही संघांनी आपली ताकद लक्षात घेत खेळाचा वेग कमी केला होता. कधी चढाई, तर कधी बचावाच्या आघाडीवर गुण मिळविण्याचा दोन्ही संघ प्रयत्न करताना दिसून आले. त्यामुळं उत्तरार्धाच्या पहिल्या दहा मिनिटांच्या खेळात केवळ आठ गुणांचीच नोंद झाली. त्यामुळं गुणफलक हरियाणाच्या बाजूने १९-१६ असा राहिला होता. सहाजिकच अखेरच्या दहा मिनिटांतील तीव्रता वाढली होती. मात्र, हरियाणा स्टिलर्सने अचानक सामन्याला वेग देत तीन मिनिटांत पाटणा संघावर लोण देत आघाडी २७-१७ अशी भक्कम केली. यामध्ये बचावाची कमाल होतीच. पण, विनयने एका चढाईत आणलेले दोन गुण तेवढेच महत्वाचे ठरले. लोण चढवल्यावर हरियाणा स्टिलर्सचे खेळाडू अधिक आक्रमक झाले आणि त्याचा सामना करण्यात पाटणा संघाला तेवढे यश आले नाही. हरियाणाने ही संधी साधून त्यांच्यावरील दडपण वाढवले. लोणनंतर पाटणा संघाला केवळ पाच गुणांची कमाई करता आली. तुलनेत हरियाणाने देखील पाच गुण मिळवून निर्विवाद वर्चस्वासह विजेतेपदाचे स्वप्न साकार केले. स्पर्धेतील विजेत्या हरियाणा स्टिलर्स संघाला करंडक आणि 3 कोटी रुपये तर, उपविजेत्या पाटणा पायरेट्स संघाला करंडक व 1.8 कोटी रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.

हेही वाचा -

  1. VIDEO : यंदाही 'पुणेरी पलटण'च प्रो कबड्डी जिंकणार; आकाश शिंदेसोबत Exclusive बातचीत
  2. प्रो कबड्डीच्या दहाव्या पर्वात पुणेरी पलटणनं मारली बाजी; विजयाचं रहस्य सांगत कर्णधार असलम इनामदार म्हणाला...
  3. Vivo Pro Kabaddi League Pune : विवो प्रो कबड्डी लीगच्या सामन्यांना पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ABOUT THE AUTHOR

...view details