नवी मुंबई : पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे हवालदार विजय चव्हाण यांची दोन मारेकऱ्यांनी 31 डिसेंबरच्या रात्री हत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. या मारेकऱ्यांनी त्यांना रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याचंही 1 जानेवारीला उघड झालं. वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र विजय चव्हाण यांच्या पत्नीनंच अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीनं त्यांचा काटा काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पत्नी पूजा हिच्यासह चौघांना वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी गुगल पेवरुन आरोपींचा माग काढून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
रेल्वे रुळावर सापडला होता विजय यांचा मृतदेह :दोन मारेकऱ्यांनी हवालदार विजय चव्हाण यांना रबाळे ते घणसोली या रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलसमोर ढकलून दिलं. ही घटना बुधवारी 1 तारखेला पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडवल्याची माहिती मोटरमननं रेल्वे पोलिसांना दिली. त्या नंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास केला असता घटनेतील मृत व्यक्ती ही पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातील हवालदार विजय चव्हाण असल्याचं समोर आलं. शवविच्छेदनात विजय यांनी मद्य प्राशन केल्याचं तसेच त्यांचा गळा दाबून खून केल्याची बाब देखील समोर आली. याप्रकरणी वाशी जीआरपी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा देखील नोंद झाला.
गुगल पेवरुन पोलिसांना लावला मारेकऱ्यांचा छडा :पोलीस तपासात विजय चव्हाण यांच्या मोबाईलमधून 24 रुपयांच्या गुगल पेवरुन शेवटचे पैसे पेड झाल्याचं निदर्शनास आलं. हे पैसे नवी मुंबईतील घणसोली इथल्या अंडाबुर्जीच्या गाडीवाल्याला देण्यात आले. पोलीस त्वरित तिथं पोहोचले आणि त्याच्याकडं अधिक चौकशी केली. तिथलं सीसीटीव्ही फुटेज देखील तपासलं. यावेळी विजय चव्हाण आणि धीरज चव्हाण यांनी ही अंडाबुर्जी विकत घेतली असं कळालं. त्याचप्रमाणं त्यांनी बाजूला असलेल्या दारूच्या दुकानातून दारूही विकत घेतली असंही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं. त्यानंतर पोलीस धीरज चव्हाण याच्यापर्यंत पोहोचले. धीरज हा उरण परिसरात राहत होता. त्याच्या इमारतीच्या बाजूचं देखील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यामध्ये रात्री दीड वाजण्याच्या सुमारास इको कार पार्क केल्याचं आढळून आलं. त्यामुळे पोलिसांचा धीरजवरील संशय वाढला. त्याचबरोबर विजय चव्हाण यांची पत्नी पूजा हिच्या आणि धीरज चव्हाण यांच्यात अनेकदा फोनवर संभाषण झाल्याचं देखील कॉल रेकॉर्डमध्ये आढळून आलं. यामुळे धीरजची चौकशी केली असता, त्यानं भूषण ब्राह्मणे, विजय चव्हाणची पत्नी पूजा चव्हाण आणि प्रवीण पानपाटील यांची नावं सांगितली.
काय आहे प्रकरण : "विजय चव्हाण यांची पत्नी पूजा चव्हाण (35) हिचे तिचा मामेभाऊ भूषण निंबा ब्राह्मणे (29) याच्याशी विवाहबाह्य संबंध होते. विजय यांचा त्यांच्या प्रेमसंबंधास अडसर येत होता. त्याचप्रमाणं विजय यांच्या त्रासाला पूजा कंटाळली होती. विजयला दारूचे व्यसन असल्यामुळे ते सतत दारू पिऊन यायचा. त्याचप्रमाणं इतर महिलांशी शारीरिक संबंध ठेवण्याची त्याला सवय होती. विजय पूजाला देखील प्रचंड त्रास देत असल्यानं पूजा कंटाळली, याबद्दल तिनं तिचा प्रियकर भूषण ब्राह्मणे याला सांगितलं. पूजाचा प्रियकर तथा मामेभाऊ असलेला भूषण आणि पूजानं विजय चव्हाण यांचा काटा काढायचा ठरवलं. लग्नाअगोदर देखील पूजाची अनेक प्रेमप्रकरणं समोर आली. त्याचबरोबर ती लग्नाअगोदर तिच्या मामासोबत देखील पळून गेली होती. पूजाचे भूषण ब्राह्मणे शिवाय धीरज चव्हाणसोबत देखील काही काळ अनैतिक संबंध होते," अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली. विजय यांची पत्नी पूजा आणि तिचा प्रियकर भूषण ब्राम्हणे यांनी या खुनाच्या कटात धीरज चव्हाण (23) आणि प्रवीण पानपाटील (21) यांनाही सहभागी करून घेतलं, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.