मुंबई :घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा नाहक जीव गेला. या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथक (एसआयटी) करणार आहे. मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या एसआयटीच्या टीममध्ये एकूण 6 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेच्या कक्ष 7 चे प्रभारी निरीक्षक महेश तावडे या पथकाचे नेतृत्व करणार आहेत.
एसआयटीनं मुख्य आरोपी भावेश भिंडेयाच्या निवासस्थानी तपास करून तेथून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यांची विविध बँकांमध्ये एकूण 7 बँक खाती आहेत. भिंडे यांना होर्डिंगचे कंत्राट कसे मिळाले? त्यांनी किती कमाई केली याचाही तपास पोलीस करत आहेत. एसआयटीनं भावेश भिंडे यांच्या कंपनीतील काही अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदवले आहेत.
काही कागदपत्रे जप्त-गुन्हे शाखेच्या कक्ष 7 चे पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत हे एसआयटी प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर होर्डिंगचे व्यवस्थापन करण्यासाठी 5 कोटी रुपये लागतात. त्यामुळे आरोपी भावेश भिंडे यांच्या व्यवसायाची आर्थिक बाजू तपासली जात आहे. होर्डिंग लावण्याची परवानगी कोणी दिली? प्रमाणपत्रे कोणी दिली? याचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले. तसेच मुलुंड येथील भावेश भिंडे याच्या इगो मीडिया प्रा. लि. च्या कार्यालयातील काही कागदपत्रे जप्त करण्यात आली असल्याची माहितीदेखील पोलिसांनी दिली आहे. एसआयटीचे पथक मंगळवारी व्हीजेटीआय (वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट) येथे पोहोचले. घाटकोपरमध्ये पडलेले होर्डिंग व्यवस्थित लावण्यात आले होते की नाही? हे शोधण्यासाठी पोलिसांना व्हीजेटीआयची मदत घ्यायची आहे. एसआयटीच्या तपासातून आणखी कोणती नवी माहिती बाहेर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे.