मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती समोर आली आहे. यामध्ये राज्यातून घाटकोपर पूर्वचे भाजपाचे उमेदवार पराग शहा हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. विशेष म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही पराग शहा हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते. जाणून घेऊया राज्यातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या उमेदवारांच्या संपत्तीबाबत माहिती.
पराग शहा यांनी घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपाकडून सलग दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. शहा यांच्याकडे 2,178.98 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 1,136.54 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यापैकी बहुतेक संपत्ती ही शेअर्स आणि इतर गुंतवणुकीशी संबंधित स्वरुपाची आहे. शहा यांनी मंगळवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे.
राज्यातील श्रीमंत उमेदवारांची यादी (Source- ETV Bharat) कोण आहेत पराग शहा?घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पराग शहा हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. मॅन कन्स्ट्रक्शन्स आणि मॅन डेव्हलपर्सचे या दोन कंपन्यांची त्यांच्याकडं मालकी आहे. मुंबईसह चेन्नई आणि गुजरातमध्ये त्यांचे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. 2017 मध्ये पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून शहा हे मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी शहा यांनी 690 कोटींची संपत्ती जाहीर केली होती. तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात पराग शहा हे सर्वात श्रीमंत नगरसेवक ठरले होते.
प्रकाश मेहता यांचा पत्ता कट झाल्यानंतर आमदारकी-शहा हे जैन आणि गुजराती समाजामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. या समाजात त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. त्यांच्या मतदारसंघात ते नेहमी सक्रिय असतात. तसेच अनेक सामाजिक कार्यक्रमातही त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत घाटकोपर पूर्व मधून तत्कालीन गृहनिर्माण मंत्री, भाजपा नेते प्रकाश मेहता यांचे तिकीट कापून पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आली होती. ते निवडणुकीत विजयी झाले. यंदा प्रकाश मेहता हे पुन्हा निवडणुकीसाठी फार इच्छुक होते. मागील दीड वर्षापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत त्यांची जवळीक वाढली होती. भाजपाच्या पहिल्या दोन यादीत पराग शहा यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे त्यांचा पत्ता कट करून प्रकाश मेहता यांना उमेदवारी दिली जाईल, असे अंदाज बांधले जात होते. परंतु अखेरच्या क्षणी पुन्हा भाजपाकडून उमेदवारी घेण्यात पराग शहा यशस्वी ठरले.
पराग शहा यांच्या संपत्तीत दहापटीनं वाढ-पराग शहा यांच्या संपत्तीची 2019 शी तुलना केली तर त्यात दहापटीनं वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्यावेळी शहा यांनी 239 कोटी रुपयांची तर, त्यांच्या पत्नीच्या नावावर 160 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. तर कौटुंबिक संपत्ती 23 कोटी रुपयांची होती. त्यांच्याकडे असलेल्या स्थावर मालमत्तेचे मूल्य 30 कोटी तर पत्नीच्या नावे मालमत्तेचे मूल्य 36.64 कोटी रुपये होते.
कोणाकडे किती आहे संपत्ती?
- शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी वरळी या मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 131 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटलं आहे. यातील 73 कोटी रुपयांची संपत्ती ही गुंतवणुकीच्या स्वरूपात आहे. तर पत्नीच्या नावावर 29.95 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यातील 17 कोटी रुपये हे गुंतवणुकीच्या स्वरूपात आहेत.
- शिवसेनेकडून मुंबादेवी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शायना एन. सी. यांनी स्वतःकडे 17.45 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. तर त्यांचे पती मनीष मुनोत यांच्याकडे एकूण 38.89 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं जाहीर केलं आहे.
- बोरिवली मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज दाखल केलेल्या गोपाळ शेट्टी यांच्याकडे 2.96 कोटी रुपयांची तर पत्नीकडे 12.18 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
विविध पक्षांतील इतर श्रीमंत उमेदवारांची यादी- - मंगल प्रभात लोढा (भाजपा) 447 कोटी रुपये (मलबरहिल मतदारसंघातील उमेदवार)
- देवेंद्र फडणवीस (भाजपा) : 13.27 कोटी रुपये (नागपूर दक्षिण पश्चिम उमेदवार)
- आदित्य ठाकरे (शिवसेना-उबाठा) : 23.43 कोटी रुपये (वरळी मतदारसंघातील उमेदवार)
- प्रताप सरनाईक (शिवसेना) : 333.32 कोटी रुपये (ओवळा माजिवडा मतदारसंघातील उमेदवार)
- राहुल नार्वेकर (भाजप) : 129.80 कोटी रुपये (कुलाबा मतदारसंघातील उमेदवार)
- जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी-शरद पवार ) 83.14 कोटी रुपये (मुंब्रा-कळवा मतदारसंघातील उमेदवार)
- आशिष शेलार (भाजपा) : 40.47 कोटी रुपये (वांद्रे पश्चिमचे उमेदवार)
- सुभाष भोईर (शिवसेना-उबाठा) : 95.51 कोटी रुपये (कल्याण ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार)
- राजू पाटील (मनसे) : 24.79 कोटी रुपये (कल्याण ग्रामीणचे उमेदवार)
हेही वाचा-
- 2019 च्या तुलनेत आमदार इच्छुकांची संख्या दुप्पट, किती उमेदवारांनी भरले अर्ज?
- महायुतीत भाजपा तर महाविकास आघाडीत काँग्रेसच 'थोरला भाऊ'; शरद पवार अजित पवारांवर पडले भारी