मुंबई Ganpati Special Trains:गणपती उत्सवासाठी (Ganpati Festival 2024) चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात. कोकणात जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेता दरवर्षी मध्य आणि कोकण रेल्वेकडून 'गणपती विशेष गाड्या' चालवल्या जातात. मात्र, रेल्वेकडून चालवण्यात येणाऱ्या या विशेष गाड्यांचं बुकिंग पहिल्या पाच मिनिटांतच फुल्ल होतात. आता हा प्रकार दरवर्षीचा झालाय. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आलीय. यावर्षी देखील रेल्वेचे आरक्षण सुरू झाल्यापासून काही मिनिटातच रिग्रेट असा मेसेज येऊ लागला आहे. त्यामुळं रेल्वेच्या या दरवर्षीच्या कारभारावर कोकणवासीयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गणेशोत्सव काळात 202 विशेष गाड्या : गणपतीसाठी रेल्वे स्थानकावर कोकणवासीयांची मोठी गर्दी असते. त्यामुळं गणेशोत्सव काळात मध्य रेल्वे 202 विशेष गाड्या चालवणार असून, पश्चिम रेल्वेकडून 56 गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता मध्य रेल्वे आणखी 50 गाड्या चालवण्याच्या विचारात आहे. रेल्वेच्या सर्वच गाड्यांचं बुकिंग फुल्ल दाखवत असल्यानं चाकरमान्यांना खासगी बसनं जावं लागत आहे. पण, हे खासगी बसचालक अव्वाच्यासव्वा भाडे आकारत असल्यानं सामान्य लोकांना हे भाडे परवडणारे कसे? असा प्रश्न सध्या कोकणवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.
तिकीट बुकिंग फुल्ल : यावर्षी 7 सप्टेंबर रोजी कोकणवासीयांच्या लाडक्या गणपतीचं आगमन होणार आहे. त्यामुळं आतापासून तिकीट काढण्याची घाई चाकरमानी करत आहेत. मध्य रेल्वेच्या 202 गणपती विशेष गाड्याचं आरक्षण 28 जुलै म्हणजे रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाले होते. पण, अवघ्या एकाच मिनिटात तिकीट बुकिंग फुल्ल झाल्याचा मेसेज प्रवाशांना आला. त्यामुळं अनेकांनी पुढच्या किंवा मागील तारखेचे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला त्यांना रिग्रेट असा मेसेज आला. त्यामुळं कोकणवासीयांमध्ये सध्या रेल्वे प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप आहे.
चाकरमान्यांचा झाला हिरमोड :मध्य रेल्वेची गाडी नंबर 01167 लोकमान्य टिळक टर्मीनस ते कुडाळ 'गणपती स्पेशल ट्रेन' 4, 5 आणि 6 सप्टेंबरला रिग्रेट दाखवत आहे. काही प्रवाशांनी गाडी नंबर 01185 लोकमान्य टिळक टर्मीनस ते कुडाळ या गणपती स्पेशल गाडीचं 4 आणि 7 सप्टेंबरचं तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. काहीनी गाडी नंबर 01151 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी या गणपती स्पेशल गाडीचं तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. या सर्वांना रिग्रेट असा मेसेज आला. रेल्वेच्या या कारभारामुळं चाकरमान्यांचा हिरमोड झाला.
गाडीचं बुकिंग करताना काळाबाजार? : गणपती स्पेशल गाड्यांची बुकिंग अवघ्या काही मिनिटातच फुल्ल होणं हे आता दरवर्षीचं झालंय. मागील वर्षे देखील असाच प्रकार घडला होता. अनेकांनी प्रयत्न करून देखील त्यांचे नाव प्रतिक्षा यादीतच राहिले. कोकणवासीयांना आपलीशी वाटणारी गाडी म्हणजे कोकणकन्या. या गाडीचं बुकिंग मागील वर्षी अवघ्या दीड मिनिटात फुल्ल झालं आणि वेटिंग लिस्ट हजाराच्यांवर गेली. त्यामुळं या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. मध्य रेल्वेने या प्रकरणाची चौकशी केली आणि यात काळाबाजार झाल्याचं उघड झालं होतं. अनेकांनी बनावट आयआरसीटीसी अकाउंट तयार करून आरक्षण केल्याचा प्रकार समोर आला होता. या वर्षी देखील असाच प्रकार घडल्यानं या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी, कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी केली आहे.