महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शाडूच्या गणेश मूर्तीसाठी बडगा; पण मातीच नाही, माती आणि पीओपी मूर्तींमधील फरक कसा ओळखायचा? - Ganeshotsav 2024 - GANESHOTSAV 2024

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सव जवळ येवू लागल्यानं राज्यभरात लगबग सुरूय. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचं आवाहन सर्वच स्तरातून केलं जातं. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (POP Ganesh Murti) मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय पालिकेनं (BMC) घेतला. यासाठी गणेश मूर्तीकारांना माती पुरवण्याचा निर्णय पालिकेनं घेतला. मात्र, ही मातीच मिळत नसल्याचे मूर्तीकारांचे म्हणणे आहे.

ganpati murti
गणेश मूर्ती (Source : ETV Bharat GFX)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2024, 10:12 AM IST

मुंबई Ganeshotsav 2024 : राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. मुंबईत हजारो कुटुंबियांकडून वापरण्यात येणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीमुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, पर्यावरणाचा विनाश टाळण्यासाठी आणि गणेशोत्सवाचं वातावरण मंगलमय करण्यासाठी गणेश भक्तांनी प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडूच्या गणेश मूर्ती वापराव्यात, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं होतं. यासाठी गणेश मूर्तीकारांनीही तयारी दर्शवली होती.

माहिती देताना गणेश मूर्तीकार (Source : ETV Bharat Reporter)

शाडूची माती मिळत नाही : मुंबईतील चिंचपोकळी येथील अनेक गणेश मूर्तिकार आपल्या चित्र शाळेत मोठ्या प्रमाणात मूर्ती तयार करत असतात. यंदाही या परिसरातील अनेक चित्र शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती तयार करण्यात येत आहेत. मात्र, यामध्ये जवळपास 70 टक्के प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तर केवळ 30 टक्के शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती आहेत. "आम्हाला सुरुवातीच्या काळात मुंबई महानगरपालिकेकडून माती उपलब्ध झाली. मात्र, सध्या माती उपलब्ध होत नाही. आम्ही जिथून माती आणतो ती दुकानेही दूर आहेत. त्यामुळं मागणी असूनही आम्हाला शाडूची मूर्ती गणेश भक्तांना देता येत नाही," अशी खंत मूर्तीकार नरेंद्र धुरी यांनी व्यक्त केली.

काय आहेत गणेशमूर्तींच्या किंमती? :गतवर्षीपेक्षा यंदा गणेश मूर्तीच्या किंमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती दीड फुटांची असेल तर तीन हजार रुपये, दोन फुटांची असेल तर साडेचार हजार रुपये आणि अडीच फुटांची गणेश मूर्ती सहा हजार रुपयांपर्यंत येते. मात्र, शाडूची गणेश मूर्ती ही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत महाग आहे. त्यामुळं गणेश भक्तांचा प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती घेण्याकडं कल असतो. शाडूच्या दीड फुटाच्या गणेश मूर्तीची किंमत सहा हजारांपासून सुरू होते, असं मूर्तीकार धुरी यांनी सांगितलं.

माती पुरवण्याचा प्रयत्न सुरू : माती पुरवण्याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं होतं. "मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आम्ही अनेक मूर्तीकारांना माती पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. काही कारणामुळं मधल्या काळात माती उपलब्ध झाली नाही. मात्र, आमचा प्रयत्न सुरू आहे", अशी प्रतिक्रिया पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

शाडू आणि पीओपीच्या मूर्ती कशा ओळखायच्या?

  • मातीची मूर्ती आणि पीओपी मूर्ती यातील फरक समजून घ्यायचा असेल तर सर्वांत सोपा उपाय म्हणजे वजन. मातीची मूर्ती वजनानं फार जड असते. तर, शाडूची मूर्ती वजनानं हलकी असते.
  • मातीची मूर्ती घडवताना लाकडी पाटाचा वापर केला जातो. गणरायाची मूर्ती लाकडी पाटावर असेल तर ती मातीची मूर्ती समजावी.
  • पीओपीची मूर्ती अधिक चमकदार असते. तर, मातीच्या मूर्तीला फार चमक नसते.
  • पीओपीच्या मूर्ती साचातून तयार केल्या जातात. त्यामुळं मूर्तीवर एकसारखेपणा दिसून येतो. तर मातीच्या मूर्ती हातानं घडवल्यानं मूर्तीच्या अनेक अवयवांमध्ये थोडाफार फरक जाणवतो.

पीओपी मूर्तींचा वापर केल्यानं काय तोटा होतो? :पीओपी मूर्तींचा वापर वाढल्यानं जलप्रदुषण वाढलंय. या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यानं समुद्रातील जैवविविधतेला धोका पोहचतोय. या मूर्ती आपण नदी, समुद्र किंवा तलावात विसर्जीत करतो. मात्र, या मूर्ती आहे तशाच राहतात. त्यामुळं पूरस्थिती देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळं संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात येतं.

हेही वाचा -

  1. गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी शिवसेना शिंदे गटाकडून मोफत बसची सोय - Ganeshotsav 2024
  2. काय सांगता! एकाच मिनिटात कोकणात जाणाऱ्या गणपती स्पेशल ट्रेनचं तिकीट बुकिंग फुल्ल; चाकरमानी संतप्त - Ganpati Special Trains
  3. गणपती बप्पा निघाले विदेशात : अमेरिका, जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलियात गणेश मूर्तींना मागणी - Ganeshotsav 2024

ABOUT THE AUTHOR

...view details