महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाडके बाप्पा विराजमान! राज्यभरात ढोल-ताशाच्या गजरात गणरायाचं आगमन; आनंदपर्वाची सुरुवात - Ganeshotsav 2024 - GANESHOTSAV 2024

Ganeshotsav 2024 Live Update
गणेशोत्सव 2024 (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2024, 8:03 AM IST

Updated : Sep 7, 2024, 10:26 PM IST

मुंबई/पुणे Ganeshotsav 2024 :ढोल-ताशा पथकांचा निनाद, बँड पथकाचे मधूर सूर, नगारावादनासह सनई-चौघड्यांचे मंजूळ सूर, ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष, पारंपरिक पेहरावातील कार्यकर्त्यांचा उत्साह अशा उत्सवी वातावरणात शनिवारी वाजत- गाजत गणरायाचं स्वागत करण्यात आलं. मानाच्या गणपती मंडळांच्या गणरायाची विधिवत मुहुर्तावर प्रतिष्ठापना करण्यात आली. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, सिंधुदुर्ग यासह सर्वच शहरातील सर्व गणेश मंडळांनी पारंपरिक मार्गावर गणरायाच्या आगमनाची मिरवणूक काढली.

लाडक्या गणरायाचं थाटात आगमन : आनंदपर्वाची गणेश चतुर्थीला गणरायाची प्रतिष्ठापना करून सुरुवात झाली. घरोघरी चैतन्यपूर्ण वातावरणात श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पूजा साहित्य खरेदीसाठी मंडई परिसरात गर्दी झाली होती. घरातील गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर कार्यकर्ते आणि ढोल-ताशा पथकातील वादक युवक-युवती पारंपरिक पेहराव परिधान करून मंडळांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.

मुंबईत गणेशोत्सवाचा जल्लोष : मुंबईत वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात अनेक मंडळांनी गणेश आगमन केलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळांनी गणपतीच्या बाप्पाच्या आगमन सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली होती. मुंबईत गणेशोत्सवाला थाटात सुरुवात झाली. उंच गणेशमूर्ती आणि भव्य-दिव्य सजावट हे मुंबईतील गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षणाचं केंद्र असतं. मुंबईतील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणूनही ओळखला जातो. मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकाया मेन्शन गणपती, जीएसबी गणपती, किंग्ज सर्कल, केशवजी नाईक चाळ, गिरगाव, परळचा राजा यासह मुंबईतील विविध मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना शनिवारी झाली.

पुण्यात पारंपरिक पद्धतीनं गणरायाचं आगमन :श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२ वाजून ११ मिनिटांनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. यंदाचे मंडळाचे १३२ वे वर्ष आहे. मानाचा तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी युवा उद्योजक पुनीत बालन व जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते करण्यात आली. यंदाचे मंडळाचे वर्ष १३८ वे वर्ष आहे. गणपतीची आगमन मिरवणूक सकाळी १०.३० वाजता सुरू झाली. मानाचा चौथ्या श्री तुळशीबाग गणपती मंडळ ट्रस्टची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी उद्योजक कृष्णकुमार गोयल आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आली. मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाडा गणेशोत्सव मिरवणुकीची सुरुवात सकाळी साडेनऊ वाजता रमणबाग चौकातून करण्यात आली. यंदा ही प्रथेप्रमाणे पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना टिळकांची पाचवी पिढी रौनक टिळक यांच्या हस्ते करण्यात आली.

कोल्हापुरातील राजघराण्यातही बाप्पाचं आगमन : लाडके बाप्पा‌ घरोघरी विराजमान झाले. कोल्हापुरातही अभूतपूर्व उत्साहात आणि चैतन्यपूर्ण वातावरणात सकाळपासूनच शहरातील कुंभार गल्लींमध्ये गणेशभक्तांनी गर्दी केली होती. कोल्हापुरातील राजघराण्यातही बाप्पाचं आगमन झालं. शाही लवाजम्यासह मानाच्या पालखीतून नवीन राजवाड्यात गणपती बाप्पा विराजमान झाले. यावेळी खासदार शाहू छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्य उपस्थित होते.

टेकडी गणेश मंदिरात भाविकांची गर्दी : नागपूर येथील ऐतिहासिक गणेश टेकडी मंदिरात सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी झाली होती. लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असल्याने गणेश भक्तांची पावले विघ्नहर्ताच्या दर्शनासाठी टेकडी गणेश मंदिराकडे वळले आहेत. या ठिकाणी असलेली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. टेकडीच्या गणपतीचा ३५० वर्षे जुना इतिहास आहे.

LIVE FEED

10:42 PM, 7 Sep 2024 (IST)

गणपती आगमनानं राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली, पाहा व्हिडिओ

गणपती आगमनानं राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली.

राज्यात जल्लोषात गणरायाचं आगमन (null)

8:17 PM, 7 Sep 2024 (IST)

'अँटिलिया'मध्ये गणरायाचं आगमन; अंबानी कुटुंबानं केली पूजा

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं. यावेळी संपूर्ण कुटुंब गणरायाच्या आगमनासाठी उपस्थित होतं. पारंपरिक पेहरावात अंबानी कुटुंबातील सदस्य यावेळी हजर होते.

7:16 PM, 7 Sep 2024 (IST)

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी लाडक्या गणरायाचं आगमन

पुणे - ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालं. यावेळी त्यांचा मुलगा प्रसाद पाटेकर देखील उपस्थित होता. मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर आरती करण्यात आली.

5:59 PM, 7 Sep 2024 (IST)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानी दोन बाप्पा विराजमान

नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालंय. नागपुर येथील घरी विघ्नहर्ता गणरायाचं भक्तिमय वातावरणात आगमन झालं. यावेळी नितीन गडकरी यांच्यासह संपूर्ण कुटुंबानं गणेशाचं स्वागत केलं. नेहमीप्रमाणे अत्यंत साधेपणानं नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी नितीन गडकरी यांच्या घरी एक नाही तर दोन बाप्पा विराजमान झालेत. गडकरी यांच्या कुटुंबातील लहान मुलांनी वेगळ्या खोलीत गणपती बाप्पाची स्थापना केली.

4:47 PM, 7 Sep 2024 (IST)

'दादासाहेब फाळके चित्रनगरी'च्या बाप्पाचं थाटामाटात आगमन; यंदाचं 31वं वर्ष

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचा अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या बाप्पाचं वाजत-गाजत, मोठया थाटामाटात आगमन झालं. विधिवत पूजा करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

यंदा बाप्पाचं 31 वे वर्ष असून महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी सर्व अधिकारी-कर्मचारी यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. चित्रनगरीचे सर्व कर्मचारी एकत्र येऊन भक्तीभावाने हा गणेशोत्सव गेली तीन दशके साजरा करतात ही परंपरेची आणि एकात्मतेची साक्ष असल्याची भावना म्हसे पाटील यांनी व्यक्त केली.'दादासाहेब फाळके चित्रनगरी'च्या बाप्पाचं थाटामाटात आगमन; यंदाचं 31वं वर्ष

4:18 PM, 7 Sep 2024 (IST)

विरोधकांनाही बाप्पा सद्बुद्धी देवो - मुख्यमंत्री शिंदे

मुंबई :महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाकडून बाप्पाची प्रतिष्ठापना केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी देखील बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विधीवत पूजा करून आरती केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. सगळ्यांच्या आयुष्यात आनंद, समाधान, समृद्धी येवो, सर्वांना सुबुद्धी देवो अशाप्रकारचे साकडं आपण गणरायाकडे घातलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

3:45 PM, 7 Sep 2024 (IST)

अभिनेता अभिजित खांडकेकरच्या घरी बाप्पाचं आगमन; मंदिर आणि पैठणीची केली आरास

नाशिक :सार्वजनिक मंडळांसोबतच घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन झालं. सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेते, सेलिब्रिटी यांच्या घरात आज गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मराठी मालिकेतील कलाकार अभिजीत आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकर दरवर्षीप्रमाणे आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी नाशिकला येत असतात. यंदा अभिजितच्या घरी गणपती मंदिर आणि पैठणीची सुरेख आरास करण्यात आली. प्रदूषण रोखण्यासाठी मूर्ती दान करा, निर्माल्य इकडे तिकडे फेकू नका, मूर्तीची विटंबना होणार नाही याची काळजी प्रत्येक भाविकांनी घ्यावी, असं आवाहन अभिनेते अभिजित खांडकेकर यांनी केलं.

3:25 PM, 7 Sep 2024 (IST)

अंबानगरीत गणरायाचे थाटात आगमन, मातीच्या मूर्तींना प्राधान्य

अमरावती : 'गणपती बाप्पा मोरया' असा जयघोष करीत आज अंबानगरीत गणरायाचे थाटात आगमन झाले. पर्यावरणपूरक मातीच्या मूर्तींना भक्तांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला. घरांमध्ये सकाळपासूनच गणपती स्थापना आणि पूजेची धामधूम पाहायला मिळत असतानाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणरायाचे आगमन दिवसभर सुरू असून रात्री उशिरापर्यंत मोठ्या मंडळात गणपतीची स्थापना होणार आहे.

3:22 PM, 7 Sep 2024 (IST)

ढोल-ताशांच्या गजरात पुण्यातील मानाच्या पाचही गणेश मंडळात बाप्पा विराजमान

पुणे :'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'चा जयघोष, शंखनाद, ढोल-ताशा पथकांचा निनाद, नगारा आणि सनई-चौघड्यांचे मंजुळ सूर, बँड पथकाचे बहारदार वादन, पारंपरिक पेहरावातील भक्त अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुण्यातील मानाचे पाचही गणपती विराजमान झाले.

3:11 PM, 7 Sep 2024 (IST)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाच्या मूर्तीची सहकुटुंब केली प्राणप्रतिष्ठा

मुंबई : दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गणरायाच्या मूर्तीची सहकुटुंब प्राणप्रतिष्ठा केली. मुंबई येथील निवासस्थानी आज बाप्पांचं आगमन झालं.

2:51 PM, 7 Sep 2024 (IST)

नागपूरच्या राजाची झाली विधिवत पूजा

नागपूर : शहरातील मानाचा गणपती अशी ओळख असलेल्या नागपूरच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. नागपूच्या राजाचे २९ वे वर्ष आहे. सकाळपासून विधिवत पूजेला सुरूवात झाली होती. दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या राजाचे वाजत गाजत मंडपात आगमन झालं होतं, आज दुपारी बाराच्या दरम्यान नागपूरच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

12:48 PM, 7 Sep 2024 (IST)

गणेशोत्सव 2024 : सर्वांना सुख समृद्धी लाभो बापाकडं साकडं - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई GANESHOTSAV 2024 :महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाकडून बाप्पाची प्रतिष्ठापना केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी देखील बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विधीवत पूजा करून आरती केली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सगळ्यांच्या आयुष्यात आनंद समाधान समृद्धी येवो, सर्वांना सुबुद्धी देवो अशाप्रकारचं साकडं आपण गणरायाकडं घातलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

12:10 PM, 7 Sep 2024 (IST)

गणेशोत्सव 2024; लालबागचा राजा'चं दर्शन घेण्यासाठी लोटला जनसागर

मुंबई Lalbaugcha Raja 2024 Live Upddate: आजपासून भाविकांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्यानं देशभरात मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. मुंबईत आज सकाळपासून लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. लालबागचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते लालबागचा राजाची प्राण प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यानंतर गणेशोत्सव 2024 चं रितसर उद्घाटन करण्यात आलं. सकाळी 6 वाजतापासून मोठ्या जल्लोषात भाविकांना दर्शन रांग खुली करण्यात आली. यावेळी भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतलं.

Last Updated : Sep 7, 2024, 10:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details