मुंबई Ganeshotsav 2024 : नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेला 'अंधेरीचा राजा', मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचं यंदाचं 59 वं वर्ष आहे. यंदा 'अंधेरीचा राजा' राजस्थान, जयपूरमधील प्रसिद्ध 'पाटवा की हवेली' मध्ये विराजमान होणार आहे. 70 हून अधिक कारागिरांनी 45 दिवसांमध्ये ही संपूर्ण सजावट पूर्ण केली आहे. मुंबईसह राज्यभरातून असंख्य गणेश भक्त अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. तसंच नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्यानं आतापर्यंत अनेक भाविकांनी आपला नवस पूर्ण झाल्यावर तो फेडताना सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू बाप्पाला अर्पण केल्या आहेत.
सुबोध सुरेश, सरचिटणीस, आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती (ETV Bharat Reporter) भारतीय सांस्कृतिक इतिहासाची समृद्धता : शनिवारपासून (7 सप्टेंबर) सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाची लगबग सर्व ठिकाणी दिसून येत असताना मुंबई देखील यासाठी पूर्णतः सज्ज झाली आहे. मुंबईत सांगायचं झालं तर बाप्पाच्या नावानं प्रत्येक विभागाचा राजा प्रसिद्ध आहे. पण त्यामध्ये 'नवसाला पावणारा, अंधेरीचा राजा' हा दरवर्षी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. याचं कारण म्हणजे बाप्पाची आकर्षक मनमोहक अशी मूर्ती आणि बाप्पा विराजमान होणारा मंडप. आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती 1966 सालापासून गणेशोत्सव साजरा करत आहे. यंदाच्या देखाव्यामध्ये राजस्थानच्या राजेशाही वारशाचे सादरीकरण केलं गेलय. मंडपातील सजावट आणि प्रतिकृतीमध्ये हवेलीच्या झरोक्यांचे, नक्षीकामाचे आणि पारंपरिक घटकांचे जिवंत चित्रण केलंय. मंडपाच्या आतील भागात 40 बाय 110 फुटांच्या क्षेत्रामध्ये मुख्य गाभारा असून तिथं गणरायांची भव्य मूर्ती स्थापित केली जाणार आहे. तसंच 2022 मध्ये अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या वस्तू वितळवून त्यापासून बाप्पाला 3 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट तयार करण्यात आलाय.
'अंधेरीचा राजा' मूषक आणि आभूषणे (ANDHERICHA RAJA MANDAL) ड्रेस कोडमुळं चर्चेत आलं होतं मंडळ : 'अंधेरीचा राजा' बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या गणेश भक्तांना 2022 मध्ये शॉर्ट पॅन्ट आणि स्कर्ट वापरण्यास बंदी घातल्या कारणानं हे मंडळ चर्चेत आलं होतं. त्यानंतर त्यांनी घातलेली बंदी आजही कायम आहे. याविषयी बोलताना मंडळाचे सरचिटणीस सुबोध सुरेश म्हणाले, "आम्ही जी प्रथा सुरू केली ती आता मोठमोठ्या गणेश मंडळानं देखील सुरू केली आहे. आता आमच्याकडं येणारे गणेश भक्त पूर्ण पोशाख परिधान करून येतात. त्यातल्या त्यात जर कोणी शॉर्ट कपडे घातले असतील तर त्यांना आम्ही लुंगी किंवा शाल अशा प्रकारचे वस्त्र देतो. कारण इथं आलेला प्रत्येक भक्तगण बाप्पाच्या दर्शनाशिवाय आणि प्रसादाशिवाय परत जाता कामा नये." तसंच आम्ही दरवर्षी विविध प्रकारचे देखावे येथे उभारतो. शिवाय दर्शनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये, याची काळजी आम्ही घेतो, असंही सुरेश यांनी सांगितलं.
'अंधेरीचा राजा' मूर्तीची आभूषणे (ANDHERICHA RAJA MANDAL) संकष्टी चतुर्थीला विसर्जन मिरवणूक : गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 11 वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून दुपारी 12 वाजता पहिली आरती होणार आहे. त्यानंतर 1 वाजेपासून भक्तांना गणपतीचं दर्शन घेता येईल. 'अंधेरीचा राजा' परिसरात एक प्रशस्त बाह्य क्षेत्र देखील आहे. ज्यामध्ये स्टॉल्स आणि प्रदर्शनं मांडण्यात आलीत. संपूर्ण परिसर 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीत असणार आहे. तसंच पुरुष आणि महिला सुरक्षा कर्मचारी, मंडळाचे स्वयंसेवक आणि स्थानिक पोलिसांकडे सुरक्षेची जबाबदारी असेल. 'अंधेरीचा राजा'चे विसर्जन हे दरवर्षी अनंत चतुर्दशी नंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिनी होत असते. यंदा 21 सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थी असल्यानं या दिवशी संध्याकाळी 6 वाजता 'अंधेरीचा राजा' विसर्जन सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा -
- बाप्पांसाठी वेचलं आयुष्य, घरी केला हजारांहून जास्त मूर्तींचा संग्रह; जाणून घ्या ठाण्यातील गणेश भक्ताची अनोखी कहानी - Ganeshotsav 2024
- लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात! 'राजा'चा पहिला लूक आला समोर; मुकुट ठरतोय चर्चेचा विषय - Ganesh Chaturthi 2024
- गणेश गल्लीतील 'मुंबईचा राजा' यंदा विराजमान होणार 'महाकाल' मंदिरात - Ganesh Galli 2024 Decoration