कोल्हापूर Ganeshotsav 2024: "गाव करेल ते राव काय करेल" या म्हणीचा प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यातल्या सोनाळी गावात (Sonali Village) आला आहे. गेली 76 वर्षे गावात घरगुती आणि सार्वजनिक गणेशाची पर्यावरणपूरक शाडूची मूर्ती बसवण्याची परंपरा गावकऱ्यांनी आजही कायम ठेवली. वाडवडिलांनी घालून दिलेल्या पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचं अनुकरण 21 व्या शतकातली तरुण पिढी आजही करत आहे. पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास न होता उत्सव साजरे करता येतात, असा संदेश या गावानं राज्याला दिला आहे.
76 वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गणेशोत्सवात पर्यावरण पूरक गणेशमूर्ती वापरण्याचं आवाहन गेल्या काही वर्षांपासून केलं जातय. जरी घरगुती गणपती शाडूच्या मातीपासून बनवलेले असेल तरी सार्वजनिक मंडळे मात्र पीओपी पासून तयार केलेल्या गणेशमूर्ती आणतात. यामुळं नदी, ओढे, तलाव यांच्यात गणेश विसर्जनानंतर प्रदूषण होतं. परंतु कोल्हापुरातील एक असं गाव आहे, तिथे गेल्या 76 वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जपली आहे.
मूर्तीदान आणि निर्माल्य दानाची चळवळ : घरोघरी रंगविरहित शाडू मातीच्या गणेशमूर्ती बसवण्याची प्रथा करवीर तालुक्यातील सोनाळी गावात गेल्या 76 वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे. तसंच या गावातील तरुण मंडळांच्या गणेश मूर्तीही रंगविरहित शाडू मातीच्याच असतात. संपूर्ण महाराष्ट्राला पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा आदर्श देणाऱ्या या गावात मिरवणूकही साऊंड सिस्टीम न वापरता काढली जाते. तसंच मूर्तीदान आणि निर्माल्य दानाची चळवळही गावात राबविली जाते हे विशेष.