छत्रपती संभाजीनगर Ganesh Festival 2024 :गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करतात. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणं आवश्यक आहे. काळाची ही गरज ओळखून छत्रपती संभाजीनगरयेथील दीपशिखा फाउंडेशनच्या मनीषा चौधरी यांनी आगळी वेगळी मोहीम राबवली आहे. शाडूच्या मातीपासून तयार झालेला बाप्पा विसर्जित झाल्यानंतर त्या मातीचा पुनर्वापर केला जात नाही, ती माती झाडांमध्ये, विहिरीत गेल्यास पर्यावरणाला घातक ठरू शकते. म्हणूनच 'बाप्पा माझा मातीचाच' ही मोहीम राबवण्यात येतेय. यापुढं साध्या मातीची मूर्ती घडवण्यासाठी चळवळ राबवणार असल्याचं मनीषा चौधरी यांनी सांगितलं.
मातीच्या बाप्पाची निर्मिती गरजेची : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या गणेशाची संकल्पना गेल्या काही वर्षांत पुढं आली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जातेय. शाडू मातीच्या मूर्तीचं विसर्जन बकेट किंवा मोठ्या भांड्यात घरच्या घरी करता येते. त्यात साचलेली माती ठेवली तर पुढच्या वर्षी याच मातीपासून मूर्ती बनवता येते. मातीच्या पुनर्वापरामुळं पर्यावरणाची हानी होत नाही. मात्र, भाविक मूर्ती विसर्जनासाठी विहिरीवर किंवा तलावात घेऊन जातात. त्या ठिकाणी मूर्ती पाण्यात विरघळली की त्यातील बारीक माती पाण्याच्या झऱ्यांमध्ये जाऊन ते बंद होण्याची भीती असते. त्याचबरोबर घरी विसर्जन केलं, तरी त्याची माती झाडाच्या मुळाशी फेकली जाते, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. त्यामुळं मातीचा पुनर्वापर करायचा असेल, तरच शाडू मातीच्या मूर्तीचा वापर करावा, अन्यथा साध्या मातीच्या मूर्तीचा वापर करा, असा सल्ला पर्यावरणप्रेमी व दीपशिखा फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा चौधरी यांनी दिला.