महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूरी अवघी अवतरली पंढरी; गणपतीसमोर साकारलेल्या पंढरपूरच्या प्रतिकृतीची भाविकांना भुरळ - Ganeshotsav 2024 - GANESHOTSAV 2024

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवात सर्वात जास्त चर्चेचा विषय असतो तो म्हणजे भव्य देखावे. यंदा चंद्रपुरातील सिव्हिल लाईन सार्वजनिक गणेश मंडळाने (Civil Line Public Ganesh Mandal) पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

Chandrapur News
चंद्रपूरात पंढरपूरच्या प्रतिकृतीची भाविकांना भुरळ (ETV BHARAT Reporter))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2024, 10:19 PM IST

चंद्रपूर Ganeshotsav 2024: दरवर्षी नाविन्यपूर्ण देखावे सादर करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळ, सिव्हिल लाईनने (Civil Line Public Ganesh Mandal) या वर्षी देखील ही परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी येथे पंढरपूरची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. विठ्ठलासोबत रुक्मिणी तसेच मंदिरात असलेल्या अनेक सूक्ष्म बाबींवर काम करण्यात आल्यानं, भाविकांना पंढरपुरातच आल्याचा भास होतो. या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.



जून महिन्यापासून तयारी : यावर्षी पंढरपूरची प्रतिकृती तयार करण्याचं ठरलं. मात्र, जितके भव्यदिव्य हे काम होते त्यासाठी मोठा कालावधी लागणार होता. त्यानुसार जून महिन्याच्या अखेरपासून तयारी सुरू करण्यात आली होती. मंडळाचे अध्यक्ष उमेश मुदलियार, उपाध्यक्ष भूषण अलोणे, सचिव शशांक गायधने, कोषाध्यक्ष चेतन हजारे, सदस्य शुभम खिरटकर, निलेश भोयर, भूषण हजारे तसेच इतर अनेक सदस्यांनी यासाठी कष्ट घेतलं आहे. त्यानंतर ही प्रतिकृती साकार करण्यात आली.

चंद्रपूरात पंढरपूरच्या प्रतिकृतीची भाविकांना भुरळ (ETV BHARAT Reporter)


असा आहे देखावा: रिंगण सोहळ्यापासून तर गोपाळपूरपर्यंत अत्यंत तपशीलवार असा देखावा निर्माण केला आहे. ज्यामुळं भाविकांना स्वतः पंढरपुरात आल्याचा भास होईल. सुरुवातीला चंद्रपूर ते पंढरपूर अशी बस दाखवण्यात आली आहे. पुढे गेल्यावर रिंगण सोहळ्याची प्रतिकृती दिसते. यानंतर संत चोखामेळा यांची समाधी. यानंतर संत नामदेव महाराज पायरी, संत कान्होपात्रा समाधी, यानंतर विठ्ठलाचं मुखदर्शन होतं. पुढे गेल्यावर मंदिराचे प्रवेशद्वार, संत भानुदास महाराज यांच्या पादुकांचं दर्शन होतं. यानंतर विठ्ठलाच्या गाभाऱ्याचं दर्शन होतं. यानंतर पुरंदर महाराज यांचा गरुड खांब, सभामंडप यानंतर रुक्मिणी मंदिर आणि यानंतर या गणेशमंडळाच्या मूर्तीचं दर्शन होतं.

संतांचा लेकुरवाळा : येथे आल्यावर संतांचा लेकुरवाळा दिसतो. जिथे संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत दामोजीपंत, संत नरहरी सोनार, संत सावतामाळी, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा, संत एकनाथ आणि भक्त पुंडलिक आपल्या आईवडीलांच्या सेवेत यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. येथेच दहीहंडी देखील ठेवण्यात आली आहे.


चंद्रभागापासून गोपाळपूर गावाचं दर्शन : गणपतीचं दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर भीमा आणि चंद्रभागा नदीची प्रतिकृती दिसते. यानंतर विष्णू मंदिर, पंढरपूरपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपाळपूर गावाचं दर्शन होतं. यात संत जनाबाई यांचा संसार दाखवण्यात आला. यामध्ये त्यांच्या घरात वापरणाऱ्यात येणाऱ्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.


मागच्या वर्षी मिळाला शासनाचा पुरस्कार : दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळाकडून वेगवेगळ्या आकर्षक देखाव्याची निर्मिती करण्यात येते. मागच्या वर्षी या मंडळानं रायगडाची प्रतिकृती साकारली होती. त्यावेळी मंडळाला राज्य शासनानाचा पुरस्कार मिळाला होता. प्रत्येक जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट देखाव्याला पुरस्कार दिला जातो. 2023 चा चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट देखाव्याचा पुरस्कार याच गणेशमंडळाला मिळाला होता. सोबत चंद्रपूर महानगरपालिकेचा पुरस्कार देखील याच मंडळाला मिळाला होता. त्याच्या आदल्या वर्षी केदारनाथ ज्योतिर्लिंगाचा देखवा साकार करण्यात आला होता.

हेही वाचा -

  1. गणेश विसर्जन सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाचा लालबागच्या राजाची दर्शनरांग कधी होणार बंद - Ganesh immersion security
  2. 'पुढच्या वर्षी लवकर या...' नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुसज्ज व्यवस्थेत सातव्या दिवशी श्रीगणेशमूर्तींचं विसर्जन - Ganesh Utsav 2024
  3. पुणे जिल्ह्यात भुलेश्वर मंदिरात श्रीगणेशाचे स्त्री रूप दर्शन - Ganeshwari in Bhuleshwar Temple

ABOUT THE AUTHOR

...view details