कोल्हापूर Kolhapur Ganesh Murti Making Workshop : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील दोन मित्रांनी घरोघरी पर्यावरण पूरक गणेशमूर्ती विराजमान व्हावी यासाठी गणपती मूर्ती बनवण्याच्या विशेष कार्यशाळा घेतल्या. गेल्या सहा वर्षांपासून ते गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेत असून या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांनी कोल्हापूरसह राज्याबाहेरही अनेक कलाकार घडवले आहेत. या दोन मित्रांच्या कार्यशाळेतून घडवलेल्या मूर्ती आता घराघरात विराजमान होणार आहेत. पर्यावरणपूरक मातीच्या आणि सुबक नक्षीकाम केलेल्या इको-फ्रेंडली गणपती बाप्पाला कोल्हापूरकरांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पर्यावरणपूरक गणेश मूर्ती : कोल्हापुरातील टेराकोटा पॉटरी आर्टिस्ट असलेले अमन शेख आणि गौरव काईंगडे या दोन तरुण मित्रांनी एकत्र येत पर्यावरण पूरक गणेशमूर्ती सोप्या पद्धतीनं कशी बनवता येईल यासाठी प्रयत्न केले. मातीपासून गणेश मूर्ती बनवल्यास पर्यावरणाची हानी होणार नाही, ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी याविषयी सखोल ज्ञान प्राप्त करून यासंदर्भातील कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. गेल्या सहा वर्षांपासून ते दोघंही शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या कॉलेज तरुण तरुणींना मातीपासून मूर्ती बनवायचं आणि त्यावर सुबक नक्षीकाम, रंगकाम करण्याचं प्रशिक्षण देत आहेत. या दोघांचं काम पाहून कलेमध्ये स्वारस्य असणाऱ्यांनीही या कार्यशाळेत भाग घेऊन घरात बसूनच आकर्षक मूर्ती बनवण्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलंय. त्यामुळं कोल्हापूरातील अनेक घरांमध्ये आता पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विराजमान होत आहेत. पर्यावरणाला कोणताही धक्का न लावता उत्सव साजरे करता येतात, हेच यातून सिद्ध होत असल्याची प्रतिक्रिया गणेशमूर्ती कलाकार अमन शेख आणि गौरव काईंगडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केली.