गडचिरोली :कधीकाळी बंदूक, बॉम्ब, नळकांड्यांशी खेळणारे नक्षलवांद्याचे सराईत हात आता पेन, मशीनची बटणं हाताळण्यात व्यस्त झाले आहेत. विश्वास बसणार नाही, मात्र गडचिरोली पोलिसांच्या अहोरात्र परिश्रमानं हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या जीवनात आशेचा नवीन किरण उगवला आहे. गडचिरोली पोलिसांनी तब्बल 48 आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना लॉयड्स मेटल कंपनीत विविध पदांवर नोकरी दिली आहे. "गडचिरोली पोलिसांपुढं आतापर्यंत 600 पेक्षा अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुनर्वसनाचं काम प्रगतीपथावर आहे," असं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी यावेळी वृत्तसंस्थेला सांगितलं.
आतापर्यंत 600 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण :गडचिरोली पोलिसांसमोर आतापर्यंत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची संख्या 600 पेक्षा अधिक आहे. सरकारनं 2014 मध्ये आत्मसमर्पण धोरणात बदल केला. त्यानंतर आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. सरकारच्या या आत्मसमर्पण योजनेनुसार आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी ठोस रक्कम आणि जमीन प्रदान करण्यात येते. मात्र यात गडचिरोली पोलिसांनी दोन पावलं पुढं जाऊन आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या रोजगारासाठी प्रयत्न केले आहेत, अशी माहिती गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी यावेळी दिली.
लॉयड्स मेटल्स कंपनीत 48 आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना नोकरी :गडचिरोलीमध्ये अलीकडंच लॉयड्स मेटल्स कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या प्रयत्नानं आत्मसमर्पण केलेल्या 48 नक्षलवाद्यांना रोजगार देण्याबद्दल चर्चा केली. या कंपनीच्या मॅनेजमेंटनंही पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची ही मागणी स्वीकारली. लॉयड्सनं त्यांच्या कोनसरी प्रकल्पात नोकरीसाठी 48 आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची निवड केली. या 48 आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना विविध विभागात काम करण्याची संधी देण्यात आली आहे. "सर्वप्रथम लॉयड्सनं आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची त्यांच्या शिक्षण आणि कौशल्यानुसार प्रोफाइलिंग केली. त्यानंतर त्यांना 3 महिन्यांचं प्रशिक्षण देण्यात आलं. आज हे सर्व 48 जणं लॉयड्सच्या विविध युनिट्समध्ये काम करत आहेत. त्यांना 15 ते 20 हजार रुपये मासिक पगार मिळत आहे," अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी वृत्तसंस्थेला दिली.