नवी मुंबई Four NCC Students Drowned : मुंबईतील रिझवी कॉलेजमधील (Rizvi College) चार विद्यार्थ्यांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना खालापूर तालुक्यातील वावरले येथे असलेल्या छोट्या बंधाऱ्यात शुक्रवारी दुपारी घडली. खालापूर तालुक्यातील सेंदई येथे रिझवी कॉलेजचे 37 विद्यार्थी कॅम्पसाठी आले होते. यामध्ये 17 मुलींचाही समावेश होता. ट्रेकिंग संपवून सर्वजण धवंडी नदीवरील छोट्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरले, तेव्हा पाण्याचा अंदाज न आल्यानं चार विद्यार्थी पाण्यात बुडाले.
चौघांचाही मृत्यू : घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी स्थानिक बचाव पथकाच्या मदतीनं विद्यार्थ्यांचा शोध आणि बचाव कार्य सुरू केलं. बचाव पथकानं बेपत्ता झालेल्या चौघांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढलं. मात्र, तोपर्यंत चौघांचाही मृत्यू झाला होता. एकलव्य सिंग, इशांत यादव, आकाश माने, रणत बंडा अशी या चौघांची नावे आहेत. चौघांचे मृतदेह चौक येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना देण्यात आली असून, पोलीस पुढील कारवाई करत आहेत.