मुंबई Mumbai Boy Kidnapped And Murder Case : वडाळ्यातून 28 जानेवारीला अपहरण झालेल्या 12 वर्षीय मुलाची निर्घृणपणे हत्या करत मृतदेहाचे दोन तुकडे करुन शांतीनगर खाडीजवळ फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडाळा टी टी पोलिसांनी मुलाच्या मृतदेहाचे कुजलेल्या अवस्थेतील धड आणि शिर असे दोन भाग ताब्यात घेऊन केईएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविल्याची माहिती वडाळा टी टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी दिली आहे. "याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन पोलीस पुढील तपास करत आहेत," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
मच्छी विक्रेत्याच्या बालकाचं वडाळ्यातून अपहरण :वडाळा पूर्वेकडील शांतीनगर परिसरात राहात असलेल्या 49 वर्षीय तक्रारदार यांचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा 12 वर्षीय मुलगा हा इथल्या एका शाळेमध्ये सहावीत शिकत होता. 28 जानेवारीच्या रात्री सव्वा आठच्या सुमारास घराबाहेर पडलेला मुलगा घरी परतलाच नाही. सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्यानं अखेर त्याच्या वडिलांनी वडाळा टी टी पोलीस ठाणे गाठून मुलगा हरवल्याची तक्रार दिली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरू केला.
मुलाच्या शरीराचे आढळले दोन तुकडे :पोलिसांनी शांतीनगर परिसरात केलेल्या चौकशीत, हा लहान मुलगा याच परिसरात राहणाऱ्या बिपुल शिकारी नावाच्या तरुणासोबत जातानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघितल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. यावेळी हा मुलगा शिकारी याच्यासोबत जाताना येथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. त्यानुसार, पोलिसांनी संशयित आरोपी शिकारी याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मात्र तो पोलीस ठाण्याजवळील बाथरुममध्ये जात तेथून पसार झाला. त्यानंतर सोमवारी या मुलाचे कुजलेल्या अवस्थेतील धड आणि मंगळवारी शिर वडाळ्यातील खाडीजवळ सापडलं. मृतदेहाच्या अंगावरील टी शर्ट, हातातील कडं आणि चप्पल यावरुन मृत मुलाची ओळख पाठवण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून संशयित आरोपी शिकारी याचा शोध सुरु केला आहे.
बिर्याणी देण्याच्या बहाण्यानं नेलं सोबत :वडाळा टी टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतीनगर परिसरातील खाडीच्या खारफुटीमध्ये 12 वर्षीय मुलाचं शिर आणि धड सापडल्यानं खळबळ उडाली. वडाळ्यातील शांतीनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या एका 12 वर्षीय मुलाला त्याच्या शेजाऱ्यानं 28 जानेवारी रोजी हॉटेलमध्ये बिर्याणी खायला देण्याच्या बहाण्यानं नेलं होतं. परिसरातील लोकांनी कसं तरी आरोपीला शोधून पोलीस ठाण्यात नेलं. मात्र वडाळा टी टी पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आरोपी पोलीस ठाण्यातून फरार झाल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे.