मुंबई Dr. Archana Patil joins BJP : विरोधी पक्षांमधले मातब्बर नेते आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्या पक्षात ओढण्याच्या मिशनमध्ये खंड पडणार नाही, याची काळजी भाजपाचे नेते घेताना दिसत आहेत. आता भाजपाने काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरच्या ज्येष्ठ नेत्याच्या सुनेला आपल्या पक्षाचं सभासदत्व दिलं आहे. माजी लोकसभाध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्चना चाकूरकर यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. त्यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यातील भाजपाची ताकद वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
मोदींच्या विकासकामानं प्रभावित होऊन : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना चाकूरकर यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर बोलताना अर्चना चाकूरकर म्हणाल्या की, ''गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात विकास कामं केली आहेत. त्यांच्या विकासकामांमुळं देशाच्या प्रगतीला वेग आला आहे. पंतप्रधानांनी महिलांसाठी नारी शक्ती वंदन विधेयकही मंजूर केलं आहे. त्यामुळं ज्या महिला राजकारणात येण्यास घाबरत होत्या, त्या आता राजकारणात उतरत आहेत. त्याचप्रमाणं मी सोनिया गांधी, सुषमा स्वराज यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना जवळून पाहिलं आहे. त्यांचं कामही मी पाहिलं आहे. त्यांचाही माझ्यावर खूप प्रभाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यानं प्रभावित होऊन मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.''