मुंबई Ashok Chavan :महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशासाठी भाजपा प्रदेश कार्यालयात जय्यत तयारी करण्यात आली होती. भाजपात प्रवेशापूर्वी, आजपासून माझ्या राजकीय कारकिर्दीची नवीन सुरुवात करतोय. मी महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
फडणवीस जे सांगतील ते करेल : भाजपात प्रवेश करताना अशोक चव्हाणांनी नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचं आभार मानलं. मोदींच्या नेतृत्वात त्यांची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करणार, असं अशोक चव्हाण म्हणाले. "मी नवीन सुरुवात करतोय. मी भाजपाच्या ध्येयधोरणांनुसार काम करेल. फडणवीस जे सांगतील, पक्ष जो आदेश देईल, ते काम मी करेल. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. योग्यवेळी योग्य गोष्टी बोलेल", असं त्यांनी नमूद केलं.
महायुतीची ताकद वाढेल : अशोक चव्हाण यांच्या प्रवेशानं भाजपाची ताकद वाढल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. "मराठवाड्यात अशोक चव्हाण यांची ताकद आहे. आता भाजपाला त्या भागात बळ मिळेल", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात भाजपा आणि महायुतीची शक्ती वाढली. आता लवकरच हजारो कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करू, असंही फडणवीसांनी सांगितलं.
म्हणून तातडीनं प्रवेश : अशोक चव्हाणांना भाजपाकडून राज्यसभेवर पाठवण्याच्या चर्चा आहेत. त्यासाठी नामांकन देण्याची अखेरची तारीख एका दिवसावर आली आहे. त्यामुळे आजच तातडीनं त्यांचा भाजपा प्रवेश करण्यात आला. आधी त्यांचा पक्षप्रवेश 15 फेब्रुवारी रोजी होणार होता. अशोक चव्हाण यांच्याशिवाय त्यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना भाजपाकडून विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. तसेच राज्यात भाजपाची सत्ता आल्यास त्यांना मंत्रीपदही मिळू शकतं. मात्र याबाबात अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
हे वाचलंत का :
- एकेकाळी 'भारत जोडो यात्रेत' बजावली होती महत्त्वाची भूमिका, आता भाजपाकडून मिळणार विधानसभेचं तिकीट!
- तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपात गेलेलं बरं; विनायक राऊतांचा अशोक चव्हाणांना टोला
- मी काँग्रेससोबत आहे, काँग्रेससोबतच राहणार; मला पक्षाकडून फारशा अपेक्षा नाहीत - विजय वडेट्टीवार