चंद्रपूर Tigress Surrounded By Gypsy Drivers :ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघिणीला जिप्सी चालकांनी घेरल्याच्या प्रकाराची गंभीर दखल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. उद्या त्यांनी या संबंधी ताडोबातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून यात संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याची माहिती आहे.
वाघ दिसावा यासाठी पर्यटकांचा अट्टहास :ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघांच्या दर्शनासाठी जिप्सीचालकांमध्ये जीवघेणी स्पर्धा लागते. जिप्सीवर बसणाऱ्या पर्यटकांना कुठल्याही परिस्थितीत वाघ दिसायला हवा असा यामागचा अट्टाहास असतो. हा दबाव दोन्ही बाजूने असतो. पर्यटकांचा दबाव हा वाघ दिसायलाच हवा असा असतो तर गाईड आणि वाहनचालक देखील वाघ दिसला तर आपल्याला बक्षीस मिळणार या प्रयत्नात असतात. यामुळे वाघांना याचा नाहक त्रास होतो आणि पर्यायाने माणसाला याचा धोका निर्माण होतो.
म्हणून ताडोबात मोबाईलवर बंदी? :ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात मोबाईलवर बंदी आहे. मोबाईलवर बंदी आणणारा महाराष्ट्रातील हा एकमेव प्रकल्प आहे. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या जिथे प्रकल्पात असलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. मोबाईलची मुभा असल्याने ह्या घटना लवकर समोर यायच्या. एकदा एका बछड्याने जिप्सीचा पाठलाग केला होता. अनेकदा वाघ दिसला असता त्याची अडवणूक करून जिप्सीनी गराडा घातल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. मोबाईलमधून ह्याचे चित्रीकरण झाल्याने असे व्हिडिओ व्हायरल व्हायचे आणि यानंतर ताडोबा व्यवस्थापन यावर कारवाई करायचे. मात्र प्रकल्प संचालक एन. आर. प्रवीण असताना अचानक ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात मोबाईल बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय व्याघ्रप्रकल्पात अशी कुठेही बंदी नाही; मात्र ताडोबात यावर निर्बंध लावण्यात आल्याने अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. केवळ व्यावसायिक कॅमेरे वापरण्याची परवानगी देण्यात आली. मोबाईलला परवानगी असताना अशा घटना समोर आल्याने ताडोबा व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होणाऱ्या घटना समोर येऊच शकल्या नाहीत. फार क्वचित अशा घटना समोर आल्या. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात होणारे नियमांचे उल्लंघन आणि त्यावर कारवाई करण्याचा ताण यातून मुक्त होण्यासाठी मोबाईलवर बंदी आणण्यात आली का? असा सवाल देखील आता उपस्थित होऊ लागला आहे.