साताराTrafficking in antelope horns : काळवीटाच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या चौघांना वन विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी सापळा रचून पकडलं. त्यांच्याकडून काळवीटाची चार शिंगे तसंच मोबाईल जप्त करण्यात आला आहे. पाटणमधील सेवानिवृत्त रेल्वे पोलिसाकडून काळवीटाची शिंगे आणली असल्याची कबुली संशयितांनी दिल्यामुळं त्याचाही तस्करीत सहभाग असल्याचा संशय वन विभागाला आहे.
सापळा रचून संशयितांना पकडलं : चौघेजण काळवीटाच्या शिंगाची तस्करी करण्यासाठी पाटण तिकाटणे येथे येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कराडचे वनक्षेत्रपाल, वराडेचे वनपाल तसंच कर्मचाऱ्यांनी पाटण तिकाटणे (वारूंजी फाटा) परिसरात सापळा रचला. त्यानंतर त्यांनी अन्नपूर्णा हॉटेलसमोर दोन संशयितांना ताब्यात घेतलं. त्यांनी आणखी दोघांचा तस्करीत सहभाग असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानुसार अन्य दोघांनाही वन विभागानं ताब्यात घेतलं.
इस्लामपूर, कराडमधील चार तस्करांना अटक :काळवीटाच्या शिंगाची तस्करी केल्याप्रकरणी वन अधिकाऱ्यांनी रत्नाकर हणमंत गायकवाड, रा. इस्लामपूर, ता. वाळवा जि. सांगली), अमर भगवान खबाले, इलाई सय्यद शेख, विशाल संभाजी शिंदे (तिघेही रा. कराड) यांना अटक केली. पाटण येथील रहिवाशी, सेवानिवृत्त रेल्वे पोलीस चंद्रशेखर भिकाजी निकम यांच्याकडून काळवीटाची शिंगे मिळाली असल्याची माहिती संशयितांनी दिली आहे.
टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचं आवाहन : साताऱ्याच्या उपवनसंरक्षक श्रीमती आदिती भारव्दाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झाझुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. संशयितांवर वन्यजीव अधिनियमन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वनक्षेत्रपाल टी.डी. नवले, आर. एस. नलवडे, सागर कुंभार, वनपाल आनंदा जगताप, बाबुराव कदम, सचिन खंडागळे, वनरक्षक शीतल पाटील, अभिजीत शेळके, सुभाष गुरव, शंकर राठोड, कैलास सानप यांनी ही कारवाई केली. वन्य प्राण्यांची शिकार अथवा तस्करी होत असल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचं आवाहन वनविभागानं केलं आहे.
हे वाचलंत का :
- केतकी चितळेची महायुती सरकारवर आगपाखड; वक्फ बोर्डाच्या मदतीवर आक्षेप - Ketaki Chitale aggressive video
- खासगी मटणाच्या दुकानात कुर्बानीला दिलेल्या परवानगी विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली - Bakra Eid 2024
- राज्यात मुस्लिम आरक्षणासाठी 'एनडीए'च्या घटक पक्षांकडून वाढला जोर; भाजपाचा थेट विरोध? - Muslim Reservation