महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न फसला, कर्नाटकच्या पाच ऊसतोड मजुरांना अटक - LEOPARD HUNTING SATARA

कराड तालुक्यात बरेली सापळ्यांच्या माध्यमातून बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडाली आहे.

Leopard hunting satara
वन विभागानं आरोपींना केली अटक (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2025, 10:20 PM IST

Updated : Jan 28, 2025, 10:33 PM IST

सातारा - कर्नाटकातील ऊसतोड मजुरांनी बहेली सापळ्यांच्या माध्यमातून बिबट्याची शिकार करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वन विभागानं पाच ऊसतोड मजुरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शिकारीचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

शिकारीचं साहित्य जप्त :प्रकाश बापूराव पवार, सुनील दिलीप पवार, विशाल दिलीप पवार, मिथुन भाऊराव शिंदे, भीमराव बाबुराव पवार (सर्व रा.भालकी, जि. बिदर, कर्नाटक), अशी वन विभागानं अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन बहेली सापळ्यांसह तारेचा पिंजरा, टोकदार सळई, तीन वाघरी, एक नायलॉन रस्सी, क्लच वायरचा फास यासारखे शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

माहिती देताना वन अधिकारी (ETV Bharat Reporter)

सापळ्यातून निसटून बिबट्याने ठोकली धूम :कराड तालुक्यातील कासारशिरंबे गावात मारुती बोंद्रे यांच्या उसाच्या शेतात बिबट्या सापळ्यात अडकला असल्याचे पोलीस पाटलाने वन विभागास कळविले. वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठले. परंतु, बिबट्याने हिसका देऊन सापळ्यातून सुटका करून घेत उसाच्या शेतात धूम ठोकली होती.

शिकारीच्या साहित्यासह संशयितांना पकडले :वन विभागाच्या पथकाने ऊसतोड मजुरांच्या झोपडीतील साहित्याची तपासणी केली असता शिकारीचं साहित्य आढळून आलं. चौकशीमध्ये पाच ऊसतोड मजुरांनीच बिबट्याच्या शिकारीसाठी बहेली सापळे लावल्याचं निष्पन्न झालं. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये वन गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली. वनक्षेत्रपाल ललिता पाटील या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

वन विभागाची मोठी कारवाई :साताऱ्याच्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक महेश झांजुर्णे, कराडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल बाबुराव कदम, वनरक्षक दशरथ चिट्टे, अभिनंदन सावंत, कविता रासवे, वनसेवक अतुल कळसे, सतीश पाटील यांनी ही कारवाई केली.

यापूर्वी तीनवेळा शिकारीचा प्रयत्न :एकट्या कराड तालुक्यात बहेली सापळा लावून यापूर्वी बिबट्याच्या शिकारीचा तीनवेळा प्रयत्न झाला होता. खोडशी गावात ८ फेब्रुवारी २०२२ रोजी बिबट्या सापळ्यात अडकला होता. त्यानंतर वर्षभरातच १८ फेब्रुवारी २०२३ रोजी तांबवे गावातही सापळा लावण्यात आला होता. त्यामध्ये कुत्रा अडकला होता. त्यानंतर २८ जुलै २०२३ रोजी सुपने गावातही कुत्रा सापळ्यात अडकला होता, तर आज कासार शिरंबे गावात बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न झाला. या सर्व घटनांमध्ये बहेली सापळ्याचा वापर करण्यात आला आहे.

हेही वाचा -चंद्रपुरात मानव अन् वन्यजीव संघर्ष शिगेला; तीन वर्षांत 98 वाघ-बिबट्यांचा मृत्यू, तर वन्यजीवांच्या हल्ल्यात 145 जणांनी गमावला जीव

Last Updated : Jan 28, 2025, 10:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details