ऑस्ट्रियाची लेक झाली चंद्रपूरची सून चंद्रपूर Foreigner Married Indian : दुसऱ्या देशातील मुलगी आपल्या देशातील तरुणाच्या प्रेमात पडते, नंतर दोघंही लग्न करण्याचा निर्णय घेतात. अगदी पारंपरिक थाटात लग्न केलं जातं. विदेशातून आलेलं वऱ्हाड पारंपरिक वेशात एन्ट्री मारतं. हे सर्व काही एखाद्या चित्रपटात शोभणारं चित्र आहे. मात्र, हे प्रत्यक्षात उतरलंय.
फॉरेनची मुलगी चंद्रपूरची सून : चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील दाबगाव इथं एक असाच विवाह सोहळा पार पडलाय. ऑस्ट्रिया देशातील मुलगी आणि महाराष्ट्रातल्या दाबगाव येथील मुलगा या दोघांचा विवाह सोहळा अगदी थाटात पार पडला. विशेष म्हणजे नवरी आणि तिच्या विदेशी सहकारी भारतीय पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. अगदी बैलगाडीतून त्यांची वरात काढण्यात आली. वऱ्हाडातील विदेशी पाहुण्यांनी देशी गाण्यावर ठेका धरत खूप आनंद लुटला. या अनोख्या विवाहाची सध्या पंचक्रोशीत तुफान चर्चा सुरु आहे.
कसे पडले एकमेकांच्या प्रेमात : चंद्रपुरातील दाबगाव येथील सुकरु पाटील आधारे हे गावातील समृद्ध कुटुंब. त्यांचा एकुलता एक मुलगा हेमंत हा उच्चशिक्षित झाला. गेली अनेक वर्षे तो ओमान या देशात चांगल्या पगारावर कार्यरत होता. मात्र, आपल्या गावासाठी काही करावं, ही भावना त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. यासाठी काय करता येईल याचा शोध घेत असताना तो ऑस्ट्रिया देशातील युडिश हरमायनी प्रित्झ हिच्या संपर्कात आला. ती मानवी अभिरुची क्षेत्रात काम करते. आफ्रिका खंडातील सोमालिया देशासाठी ती काम करते. संपर्कात आल्यावर दोघांमधल्या तारा जुळल्या आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही बाब हेमंतने घरच्यांना सांगितली. त्यांनी देखील याला होकार दिला. हेमंतला एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये रणधुमाळीत लग्न करणं सहज शक्य होतं. मात्र त्यानं हे लग्न गावातच करण्याचं ठरवलं.
शेतातच केलं लग्न : मग हेमंतनं ही जबाबदारी उचलत आपल्या गावातच लग्नाची सर्व तयारी केली. शेतात लग्नमंडप सजवला. लग्नाची पत्रिकाही छापण्यात आली. 12 फेब्रुवारीला हा लग्नसमारंभ मोठ्या थाटात पार पडला. अनेक विदेशी पाहुणे या लग्नासाठी हजर झाले. आदल्या दिवशी हळद आणि लग्नाचा मनसोक्त आनंद त्यांनी लुटला. इथं येऊन आम्हाला खूप आनंद झाला. येथील लोक हे अत्यंत मनमिळाऊ आणि सहकार्य करणारे आहेत, अशी प्रतिक्रिया या विदेशी पाहुण्यांनी दिली. या लग्नसमारंभाची चर्चा आता सर्वत्र होऊ लागलीय.
हेही वाचा :
- कोळसा कंपनीच्या विरोधात ग्रामस्थांचा असाही लढा; अखेर गावकऱ्यांनी स्थापन केले स्वतंत्र ग्राम न्यायालय
- श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेला चंद्रपूरमधून जाणार किरकोळ महाराज, 100 पुरोहितांमधून झाली निवड