ठाणे : निवडणुकीच्या आचारसंहिता काळात प्रशासनाच्या भरारी पथकांनी अवैध आर्थिक व्यवहारांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा असते. मात्र, उल्हासनगरात अशाच एका पथकाने स्वतःच खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फुले उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे देण्यासाठी रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याकडून ८५ हजारांची खंडणी घेण्यात आली आणि हे प्रकरण १३ दिवसांनी समोर आलं. अखेर याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील पाचही अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई करत घरचा रस्ता दाखवला आहे.
गाडी अडवून केली तपासणी: २८ ऑक्टोबर रोजी पहाटे व्यापारी बबन आमले आणि त्यांचे मित्र नितीन शिंदे हे कल्याणवरून अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फुले उत्पादनाच्या विक्रीचे पैसे देण्यासाठी जात होते. म्हारळ चौकीजवळ आचारसंहिता भरारी पथक क्रमांक सहाचे प्रमुख संदीप शिरसवाल यांनी त्यांची गाडी अडवून तपासणी केली. तपासणी दरम्यान, त्यांच्याकडं ७ लाख ५० हजार रुपये रोख सापडले. यानंतर, पथकप्रमुखांनी आमले आणि शिंदे यांना गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली. आमले यांनी पावत्या दाखवून पैसे वैध असल्याचं स्पष्ट केलं, तरीही शिरसवाल यांनी त्यांच्याकडून ८५ हजार रुपये खंडणी घेतली.
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? : सदर प्रकार उघडकीस यायला १३ दिवस लागले, ज्यामुळं या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न होत होता का? असा प्रश्न निर्माण झालाय. या प्रकाराची माहिती भरारी पथक क्रमांक ३ चे प्रमुख संकेत चनपूर यांना होती. मात्र त्यांनीही शिरसवाल यांच्या कृत्याला मूकसंमती दिली. घटनास्थळी पथकातील इतर सदस्य देखील होते. ज्यात उल्हासनगर महापालिका कर्मचारी आण्णासाहेब बोरूडे, तसंच पोलीस हवालदार विश्वनाथ ठाकूर आणि राजरत्न बुकटे यांचा समावेश आहे. तथापी, भरारी पथकातील या सदस्यांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिली नव्हती, ज्यामुळं हे प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे.
पाच सदस्य तत्काळ निलंबित : स्थानिक माध्यम प्रतिनिधींनी या प्रकरणाबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडं विचारणा केल्यानंतर कारवाई सुरू झाली. अखेर, उल्हासनगर महापालिकेचे सहायक आयुक्त आणि विधानसभेचे आचारसंहिता पथक प्रमुख सुनिल लोंढे यांच्या फिर्यादीवरून या पाच जणांविरुद्ध खंडणी आणि आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पथकातील सर्व पाच सदस्यांना तत्काळ निलंबित करण्यात आलं असून, त्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. यापुढे प्रत्येक तपासणीचं चित्रीकरण करणं अनिवार्य असल्याचं आदेश त्यांनी दिले.
कर्तव्यात कसूर केल्यानं गुन्हा दाखल :या गुन्ह्यातील उल्हासनगर महानगरपालिकेचे लिपिक संकेत चनपूर, संदीप शिरसवाल आणि मुकादम आण्णासाहेब बोरूडे तसंच या पथकातील पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार विश्वनाथ ठाकूर आणि पोलीस नाईक राजरत्न बुकटे यांच्यावर निवडणूक कर्तव्यात कसूर केल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याद्वारे ८ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर तातडीनं निलंबनाचीही कारवाई करण्यात आली. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या सर्व पथकांनी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेलं निवडणुकीचं काम योग्यरित्या आणि नि:पक्षपाती करणेबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी कडक निर्देश दिले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी शिनगारे यांच्या या कठोर कारवाईमुळं मतदारसंघातील सर्वच पथकं सतर्क झाली आहेत.
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? : निवडणुकीच्या काळात आचारसंहिता पाळण्याची जबाबदारी असलेल्या भरारी पथकाचाच भ्रष्टाचारात सहभाग असल्यानं सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. "आचारसंहितेचे नियम सर्वसामान्यांसाठीच आहेत का?" असा सवाल नागरिक करत आहेत. राजकीय दबावामुळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला का? याचा तपास सुरू आहे.
हेही वाचा -
- काँग्रेसकडून 22 मतदारसंघांतील 28 बंडखोरांचे निलंबन; 'ते' बंडखोर नेमके कोण?
- अजित पवारांच्या दौऱ्याची काँग्रेसच्या आमदाराकडून जय्यत तयारी; काँग्रेसनं केलं निलंबित
- काँग्रेसच्या 16 बंडखोरांची हकालपट्टी; 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित