महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले; कोल्हापूर, सांगलीला महापुराचा वेढा, प्रशासन हाय अलर्टवर - Kolhapur Floods

Kolhapur Floods : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून राधानगरी धरण 100% भरलं आहे. यामुळे धरणातून भोगावती नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं असून यामुळे पंचगंगा नदीला पूर आलाय. राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. परिणामी, महापुराचा फटका प्रयाग, चिखली आणि आंबेवाडी गावाला बसलाय. जाणून घ्या कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती...

Kolhapur Floods
कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना महापूर (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 6:13 PM IST

Updated : Jul 25, 2024, 6:43 PM IST

कोल्हापूरKolhapur Floods :जिल्ह्याच्या घाटमाथ्यासह कोल्हापूर शहर आणि जिल्हा परिसरात सुरू असलेल्या अति मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 100 टक्के भरलं असून धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. राधानगरी धरणातून भोगावती नदीपात्रात होणाऱ्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असून पुराचा सर्वाधिक फटका बसत असलेल्या प्रयाग, चिखली आणि आंबेवाडी गावाला पुरानं वेढा दिला आहे. जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत चिखली आणि आंबेवाडी गावच्या ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याचं आवाहन केलं होतं. असं न केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा करवीरचे प्रांताधिकारी हरीष धार्मिक यांनी दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर स्थितीविषयी सांगताना संबंधित अधिकारी (ETV Bharat Reporter)

अलमट्टी मधून विसर्ग वाढवण्याची मागणी :पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला 2019 आणि 2021 नंतर यंदाही महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. दोन्ही जिल्ह्याला महापुराचा फटका बसू नये यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारच्या प्रशासनाने अलमट्टी धरण प्रशासनाशी संपर्क साधून अलमट्टी मधून विसर्ग वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार सध्या अलमट्टी धरणातून 2 लाख 45 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं सांगली कोल्हापूर जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे; मात्र राधानगरी धरण अति मुसळधार पावसानं शंभर टक्के भरलं असून या धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. राधानगरीच्या 3, 4, 5, 6 या स्वयंचलित दरवाजांमधून 7 हजार 212 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर फौजदारी गुन्हे दाखल करणार :पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यानं पूरग्रस्त असलेल्या करवीर तालुक्यातील आणि आंबेवाडी गावातील नागरिकांनी आपल्या पशुधनासह तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. अन्यथा स्थलांतरित न होणाऱ्या नागरिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा करवीरचे प्रांताधिकारी हरीष धार्मिक यांनी दिला. आंबेवाडी आणि प्रयाग चिखली भागात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, तहसीलदार स्वप्नील रेवडे, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने पाहणी केली. यावेळी सरपंच रोहित पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

परिस्थिती अजूनही नियंत्रणात-एनडीआरएफ :राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाल्यामुळे भोगावती नदीत पाण्याचा विसर्ग वाढला आहे. यामुळे चिखली आणि आंबेवाडी गावात पाणी शिरण्याला सुरुवात झाली आहे. 32 जवानांचे इंडिया पथक सध्या या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून या पथकाचे प्रमुख निरीक्षक विजय यांनी अजूनही परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं. तसंच गरज भासल्यास आणखी एक राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात येईल, असं सांगितलं.

कोयना धरणातून 11 हजार 50 क्युसेक विसर्ग : सातारा जिल्ह्यात कोयना धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे.आज सकाळी 8 वाजता धरणामध्ये एकूण ७५.२६ टीएमसी अर्थात 71.57 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज संध्याकाळी धरणाचे वक्र दरवाजे 1 फूट 6 इंच उचलून सांडव्यावरून 10 हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील 1050 क्युसेक विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 11 हजार 50 क्युसेक विसर्ग कोयना नदीत होणार आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. बाराशे ग्रामस्थांचा तुटला संपर्क ; भातसा नदीवरील पूल महिन्याभरात चौथ्यांदा पाण्याखाली - Heavy Rain In Thane
  2. पुणे शहरात पावसाचा हाहाकार; आज शाळा राहणार बंद - Pune Rain Update
  3. लाइव्ह राज्यात पावसाचा कहर; पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार, अजित पवारांनी घेतला आढावा - Heavy Rainfall in Maharashtra
Last Updated : Jul 25, 2024, 6:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details