प्रतिक्रिया देताना हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजयसिंह पाटील सातारा First Tavi surgery: सातारा जिल्ह्यातील पहिली ‘टावी’ (ट्रान्स कॅथॅटर अवॉर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट) अर्थात कृत्रिम झडप बसविण्याची शस्त्रक्रिया (Tavi Surgery) यशस्वी झालीय. कराड तालुक्यातील मसूर गावातील ८८ वर्षांच्या वृद्ध रूग्णावर भूल न देता आणि कोणतीही चिरफाड न करता ही अत्यंत गुंतागुंतीची मानली जाणारी शस्त्रक्रिया करण्यात आलीय. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजयसिंह पाटील यांनी ही शस्त्रक्रिया केलीय.
सातारा जिल्ह्यातील पहिली शस्त्रक्रिया : वयोवृध्द रूग्णावर प्रचलित बायपास शस्त्रक्रिया करणं काही वेळा धोक्याचं ठरू शकतं. याचा विचार करून ओपन हार्ट सर्जरी टाळून ट्रान्सकॅथेटर अवॉर्टिक व्हाल्व रिप्लेसमेंट (टावी) ही अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया रुग्णास भूल न देता तसंच कोणीही चिरफाड न करता कराडसारख्या ग्रामीण भागातील रुग्णालयात करण्यात आलीय. या शस्त्रक्रियेद्वारे कराड तालुक्यातील मसूर गावचे प्रसिध्द ज्योतिष विशारद ज्ञानेश्वर भोज (सर) यांच्या हृदयामध्ये कृत्रिम झडप बसवण्यात आली आहे. अशा प्रकारची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी होणं ही सातारा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील पहिलीच घटना आहे.
टावी शस्त्रक्रियेद्वारे बदलली झडप :अवॉर्टिक व्हाल्व स्टेनॉसिस म्हणजेच त्यांच्या हृदयाची एक झडप पूर्णपणे उघडत अथवा बंद होत नव्हती. ती झडप बदलणं आवश्यक होतं. जास्त वय आणि कमी वजनामुळं भोज यांची बायपास शस्त्रक्रिया करणं शक्य नव्हतं. त्यामुळं ‘टावी’ शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार हृदयातील खराब झालेल्या अवॉटिक व्हाल्वच्या (झडप) जागी एक छोटे छिद्र घेऊन कॅथेटर हृदयापर्यंत नेण्यात आला आणि झडप बदलण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवसापासून रुग्ण चालायला लागला, असं डॉक्टरांनी सांगितलं.
दोन दिवसाच्या बालकाच्या ह्रदयावरही शस्त्रक्रिया: काही वर्षापूर्वी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजयसिंह पाटील यांनी दोन दिवसाच्या बालकाच्या हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी केली होती. या बालकास जन्मताच धाप लागण्याचा त्रास होता. आज तो मुलगा सात वर्षांचा असून त्याला आता हृदयाच्या संदर्भातील कसलाही त्रास नाही. या शस्त्रक्रियेबद्दल डॉ. विजयसिंह पाटील यांचा अमेरिकेत सन्मान देखील झाला होता.
हेही वाचा -
- मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलची कमाल; उज्जैनवरुन आलेल्या 32 वर्षीय तरुणाचे हात प्रत्यारोपण यशस्वी
- देवाने डोळे दिले पण नजर दिली डॉक्टरांनी; दोन वर्षांच्या मुलीवर झाली यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया
- वैद्यकीय चमत्कार! पहिलं बाळ गर्भात दगावल्यानंतर दुसऱ्या बाळाची १२५ दिवसांनी प्रसूती